अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर सांगली बाजारात नैसर्गिक गुळाची आवक वाढली

सांगली : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुळातील भेसळ आणि रासायनिक प्रक्रियांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाली आहे. गुळाला आकर्षक केशरी, पिवळा किंवा लालसर रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर निर्बंध आल्यामुळे सांगली मार्केट यार्डमध्ये आता नैसर्गिक रंगाचा, रसायनमुक्त आणि फिकट दिसणारा गूळ मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागला आहे.

यापूर्वी सांगली मार्केट यार्डमध्ये कर्नाटक सीमाभाग, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर गुळाची आवक होत होती. मुंढे यांनी कारवाई सुरू केल्यानंतर काही काळ गुळाच्या व्यवहारांवर परिणाम झाला आणि अनेक आडत्यांनी व्यवहारही थांबवले होते. मात्र, कारवाई कायम राहणार हे स्पष्ट झाल्यानंतर उत्पादकांनी रसायनांचा वापर टाळून नैसर्गिक पद्धतीने गूळ तयार करण्यास सुरुवात केली.

ChiniMandi WhatsApp Channel

पूर्वी बाजारात केशरी, पिवळसर किंवा लालसर रंगाचा गूळ अधिक प्रमाणात उपलब्ध असायचा आणि त्याच रंगाच्या आधारे ग्राहक त्याला प्राधान्य देत असत. आता गूळ तयार करताना कृत्रिम रंग आणि रसायनांचा वापर बंद झाल्यामुळे नैसर्गिक रंगाचा गूळ बाजारात येत आहे. हा गूळ गुणवत्तेने उत्तम, चवदार आणि भेसळमुक्त असला तरी त्याचा फिकट रंग पाहून अनेक ग्राहक खरेदी करण्यास कचरतात, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

विशेषतः सणासुदीच्या काळात पुरणपोळीसारख्या पारंपरिक पदार्थांसाठी केशरी किंवा पिवळसर रंगाच्या गुळाला अधिक मागणी असते. त्यामुळे नैसर्गिक रंगाचा गूळ पाहून काही ग्राहक तो कमी दर्जाचा असल्याचा समज करून घेतात. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना हा गूळ रसायनमुक्त आणि नैसर्गिक पद्धतीने तयार झाल्याचे समजावून सांगितल्यानंतर ते खरेदीस तयार होतात.

गुळाचा रंग बदलण्यामागे उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा मोठा वाटा होता. गूळ अधिक उजळ आणि आकर्षक दिसावा यासाठी सोडियम हायड्रोसल्फाईट, रंग टिकून राहावा यासाठी सल्फर डायऑक्साइड, तसेच विविध कृत्रिम रंगद्रव्यांचा वापर केला जात होता. अन्न व औषध प्रशासनाने या रसायनांवर निर्बंध आणल्यानंतर उत्पादकांनी त्यांचा वापर बंद केला असून, त्यामुळे बाजारात नैसर्गिक रंगाचा आणि रसायनमुक्त गूळ उपलब्ध होऊ लागला आहे.

दरम्यान, काही ठिकाणी गुळामध्ये साखरेची भेसळ होत असल्याची चर्चा सुरू असली तरी सांगली मार्केट यार्डमध्ये सध्या नैसर्गिक गुळाची आवक वाढल्याचे व्यापारी आणि शेतकरी सांगत आहेत. ग्राहकांमध्ये नैसर्गिक गुळाबाबत जागृती वाढल्यास या गुळाला भविष्यात अधिक मागणी मिळू शकते, असा विश्वास बाजारातील जाणकार व्यक्त करत आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here