महाराष्ट्र : साखर विक्री दरासह उपपदार्थांचे खरेदी दर वाढविण्याची गरज – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

अहिल्यानगर : साखर उद्योगाबरोबरच शेतकरी, कामगारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर साखर विक्रीच्या किमतीत व साखरेपासून तयार होणाऱ्या उपपदार्थांचे खरेदी दर वाढले पाहिजे तरच आपले प्रश्न सुटतील, असे मत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे राज्यस्तरीय साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन निवासी शिबिरात ते बोलत होते. पूर्वी १८० दिवस चालणारा साखर हंगाम आता १०० ते ७६ दिवसावर आला आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे, स्पर्धा वाढत आहे, घरगुती व व्यवसायासाठी लागणाऱ्या साखरेचे दर स्वतंत्ररित्या असावे, ग्राहकाला सांभाळण्याच्या नादात सहकार व त्यावर अवलंबून असणाऱ्या साखर कारखानदारीतील घटकावर अन्याय करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शिबिरात सुरुवातीला राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस रावसाहेब पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, अविनाश आपटे, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, उपाध्यक्ष युवराज रणवरे, अशोक बिराजदार, नितीन बेनकर, दत्तात्रय निमसे, प्रदीप शिंदे, सचिव राजेंद्र तावरे, सयाजी कदम, संजय पाटील, संजय मोर, योगेश हंबीर यांनी कामगारांचे प्रश्न मांडले. साखर कामगारांच्या हितासाठी एफआरपी बरोबरच कामगारांचे पगाराचा समावेश व्हावा, सेवानिवृत्तीनंतर साखर कामगारांना समाधानकारक पेन्शन मिळावी आदी ठराव मांडून कामगार चळवळ जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकोपा साधत केंद्र व राज्य शासनावर दबाव आणून कामगार अहिताचे कायदे रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली. तात्यासाहेब काळे यांनी विविध उद्योग व्यवसायात खासगीकरणाचे व कंत्राटी कामगारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने साखर कामगारांसह सर्वच कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असे सांगितले. छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर, आ. आशुतोष काळे यांनी मार्गदर्शन केले. चंद्रकांत पवार, आझाद शेख, दत्तात्रय शेलार, प्रमोद खलाटे, अजय पोटबळ, अजय दवंगे, सर्जेराव हळदकर यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष युवराज रणवरे यांनी आभार मानले. चंद्रशेखर कलगे यांनी सूत्रसंचालन केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here