सोलापूर : आदिनाथ कारखाना संचालक चालू करणार की लिलाव होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष

सोलापूर : करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने गेल्या तीन वर्षापासून बंद आहे. कारखान्यात काम करणाऱ्या ८०० कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हजारो सभासद असलेला कारखाना बंद अवस्थेत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेजारील तालुक्यात ऊस गाळपासाठी द्यावा लागत आहे. कारखान्याचा लिलाव अथवा विक्री झाल्यास कामगारांची थकलेली कोट्यवधी रुपयांची देणी कोण देणार? तर लिलाव अथवा विक्रीद्वारे कारखाना घेणारा पूर्वीच्या कामगारांना कारखान्यात पुन्हा कामावर घेणार का? असा सवाल कामगारांतून विचारला जात आहे. कारखान्याची संपूर्ण प्रॉपर्टी ४५० कोटी रुपयांची असताना कारखान्याचा अवघ्या १२० कोटी रुपयात लिलाव झाल्यास लिलाव घेणाऱ्या व्यक्तीस कारखान्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, सध्या विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाच्या ताब्यात आहे. सद्यस्थितीत आदिनाथ कारखान्यावर एनसीडीसी या वित्तीय संस्थेचे कर्ज असल्याने कारखान्याचा लिलाव होणार असल्याने शेतकरी सभासदांसह कामगार वर्गात खळबळ माजली आहे. आदिनाथचा लिलाव उद्योजक बाबुराव बोत्रे यांच्या ओंकार शुगरकडे जाणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन व आमदार नारायण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. कारखाना बंद असल्याने कारखाना परिसरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांची आर्थिक उलाढाल बंद झाली आहे. कारखाना लिलाव व विक्रीपासून वाचविण्यासाठी व तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी सर्वच नेते मंडळीनी गट तट, पक्षभेद विसरून एकत्रित येण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here