‘एआय’ तंत्रज्ञान वापराने एकरी १५० टन ऊस उत्पादन शक्य : आमदार जयंत पाटील

सांगली : ईश्वरपूर येथे सांगली जिल्हा परिषद व वाळवा पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते राजारामबापू पाटील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच कृषी पंधरवड्यानिमित्त आयोजित शेतकरी सन्मान सोहळा व एकरी १५० टन ऊस उत्पादन कार्यशाळा झाली. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी १५० टनांहून अधिक उत्पादन घेणे शक्य आहे. त्यासाठी व्हीएसआय व साखर कारखान्यांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले.

या कार्यशाळेदरम्यान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ समाधान सुरवसे यांनी एकरी १५० टन ऊस उत्पादनासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन व उत्पादनवाढीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विनोद तोडकर (कासेगाव), अशोक खोत (ईश्वरपूर), प्रतीक पाटील (साखराळे), पंजाबराव पवार (रेठरे हरणाक्ष), शोभा पाखले (बोरगाव), अमृत कलश महिला शेतकरी कृषी स्वयंसहाय्यता बचत गट (बोरगाव), अमृतधारा महिला उत्पादक गट (गाताडवाडी) यांच्यासह जिल्हा परिषदेच्या ११ गटांतील ७५ प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, कृषी व पशु संवर्धन सभापती सावित्री रवि पाटील, पंचायत समितीचे सभापती उदयसिंह पाटील, उपसभापती प्रकाश पाटील, कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, शिरीष माने, तालुका कृषी अधिकारी इंद्रजीत चव्हाण उपस्थित होते. सभापती उदयसिंह पाटील यांनी स्वागत केले. छाया माळी व रुपाली माळी यांनी सूत्रसंचालन केले. कृषी अधिकारी अभिजीत घोरपडे यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here