सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माढा शहरात मंगळवारी श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलप्रश्नी तिरडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मोर्चापूर्वीच कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. सर्व थकीत ऊस बिले २० ऑगस्टपर्यंत अदा करण्यात येतील, असे आश्वासन साठे यांनी दिले. या आश्वासनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी शेतकऱ्यांच्या भावना व मागण्या ऐकून घेतल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भाऊ पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा निघणार होता. त्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले होते. या आंदोलनात मराठा सेवा संघाचे दिनेश जगदाळे, कार्याध्यक्ष आजिनाथ परबत, तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड, प्रताप पिसाळ, बापू मेजर, माजी सरपंच सतीश उबाळे, दत्ता पंडित, दादा परळी, फैजल शेख, मच्छिंद्र बोरकर, ज्ञानेश्वर गायकवाड, कांचन गायकवाड, मिनीनाथ परबत, दीपक शिंदे यांच्यासह माढा, करमाळा आणि परंडा तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले. दिलेल्या आश्वासनानुसार ऊस बिले न मिळाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


















