पुणे: राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी थकीत एफआरपी (फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस) संदर्भातील चुकीची आकडेवारी साखर आयुक्त कार्यालयाला सादर केल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. अशा कारखान्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्याशी झालेल्या बैठकीत केली.थकीत ऊसबिल, एफआरपीची अंमलबजावणी, उसाच्या वजनातील अनियमितता, रिकव्हरी (उतारा) चोरी आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शेट्टी यांनी साखर उद्योगातील कथित गैरव्यवहारांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत अनेक ठोस मागण्या मांडल्या.
एफआरपी आकडेवारीत मोठी तफावत
राज्यातील साखर कारखान्यांनी सादर केलेली थकीत एफआरपीची आकडेवारी आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे असलेली थकबाकी यामध्ये मोठा फरक असल्याचा दावा शेट्टी यांनी केला. कारखानदार शासनाची दिशाभूल करत असल्याने संबंधित कारखान्यांविरोधात तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी त्यांची मागणी आहे.
विलंबाने दिलेल्या एफआरपीवर व्याज द्यावे
गेल्या तीन वर्षांत दोन किंवा तीन टप्प्यांत एफआरपी अदा करणाऱ्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना विलंबाच्या कालावधीचे व्याज तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावे, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारच्या टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्याच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला.
वजनकाटे AI तंत्रज्ञानाशी जोडण्याची मागणी
उसाच्या वजनात आणि रिकव्हरीमध्ये होणारी कथित चोरी रोखण्यासाठी राज्यातील सर्व वजनकाटे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाइन जोडावेत, अशी महत्त्वाची मागणी शेट्टी यांनी केली. त्यामुळे काटामारी आणि वजनातील फेरफार थांबविण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील काही कारखान्यांमध्ये रिकव्हरी चोरीचे प्रमाण वाढल्याचा आरोप करत, त्या भागात साखर आयुक्त कार्यालयाने स्वतंत्र तपासणी यंत्रणा उभारावी, अशीही मागणी करण्यात आली.
५०० टनांपेक्षा जास्त ऊस दाखवणाऱ्या शेतकऱ्यांची नावे जाहीर करावीत
उसाच्या वजनातील गैरप्रकार आणि बोगस नोंदी टाळण्यासाठी प्रत्येक हंगामात ज्या शेतकऱ्यांच्या नावे ५०० टनांपेक्षा जास्त ऊस दाखवला जातो, अशा सर्व संशयास्पद प्रकरणांची नावे सार्वजनिकरित्या जाहीर करावीत, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
वाढलेल्या साखर दराचा फायदा शेतकऱ्यांना द्यावा
चालू गळीत हंगामात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखर तसेच उपपदार्थांच्या दरात वाढ झाल्याने कारखान्यांचा नफा वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति टन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने अदा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. तसेच, देशात आणि राज्यात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने केंद्र सरकारने कोणत्याही परिस्थितीत साखर आयात करण्याचा निर्णय घेऊ नये, अशी भूमिका संघटनेने मांडली.
सहकार मंत्र्यांवरही शेट्टींची टीका
राजू शेट्टी यांनी राज्याच्या सहकार मंत्र्यांवरही थेट निशाणा साधला. “राज्याच्या सहकार मंत्र्यांच्याच साखर कारखान्याने शेतकऱ्यांची एफआरपी दिलेली नसल्याचा आरोप होत असेल, तर प्रशासन कायदेशीर कारवाई नेमकी कोणावर करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.या बैठकीला अॅड. योगेश पांडे, प्रभाकर बांगर यांच्यासह साखर आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


















