धाराशिव: उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याकडून गेल्या सात महिन्यांपासून ऊसबिले थकीत असल्याचा आरोप करत शेकडो शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हातात उसाचे वाढे, मागण्यांचे फलक आणि घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अनोखे ‘भीक मागो’ आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झाली. शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येत हातात उसाचे वाढे उंचावत जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. “ऊसबिल आमच्या हक्काचे, कोणाच्या बापाचे नाही”, “ऊसाचे पैसे मिळालेच पाहिजेत”, “आमचे पैसे कोणी खाल्ले?” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी रस्त्यालगतच्या व्यापाऱ्यांकडून आणि फळविक्रेत्यांकडून प्रतीकात्मक स्वरूपात एक-दोन रुपये गोळा करत ‘भीक मागो’ आंदोलन केले. या आंदोलनातून थकीत ऊसबिलामुळे निर्माण झालेली आर्थिक बिकट परिस्थिती त्यांनी अधोरेखित केली.
शेतकऱ्यांनी सांगितले की, रात्रंदिवस कष्ट करून कारखान्याला ऊस पुरवला, मात्र सात महिने उलटूनही हक्काचे पैसे मिळालेले नाहीत. घरखर्च, मुलांचे शिक्षण, शेतीसाठी लागणारा खर्च आणि कर्जाचे हप्ते कसे भरायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.स्वतःच्या कष्टाच्या पैशांसाठी प्रशासनासमोर भीक मागण्याची वेळ कारखान्याच्या कारभारामुळे आली असल्याचा आरोप करत, थकीत ऊसबिले तातडीने अदा करावीत आणि संबंधित कारखान्यावर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली.


















