लातूर : सोळा वर्षांपासून बंद जय जवान साखर कारखाना सुरू करण्याची मागणी

लातूर: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या संकल्पनेतून १९८४ मध्ये चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे जय जवान जय किसान सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली. सुमारे ३० वर्षे कारखाना सुरळीत चालला. मात्र, कालांतराने तांत्रिक अडचणी आणि आर्थिक संकटामुळे तो बंद पडला. कारखाना तब्बल १६ वर्षांपासून बंद आहे. यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. चाकूर, अहमदपूर, उदगीर व शिरूर अनंतपाळ तालुक्यांतील ऊस उत्पादकांना कारखाना बंद असल्याचा मोठा फटका बसत आहे. परिसरातील ऊस उत्पादकांची अडचण लक्षात घेता कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

राज्यातील बंद साखर कारखाने सुरू होणार असल्याच्या चर्चेमुळे ‘जय जवान’ सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारखान्याचे दहा हजार शेतकरी सभासद असून, २९८ गावांत सात तालुक्यांत त्याचे कार्यक्षेत्र आहे. प्रतिदिन १२ हजार ५०० मेट्रिक टन गाळप क्षमता आणि सुमारे ३०० एकर जमीन असलेल्या कारखान्यात पूर्वी ३०० कामगार कार्यरत होते. हा कारखाना चाकूर-अहमदपूर विधानसभा मतदारसंघात येतो. काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी लवकरच कारखाना चालू करू, अशी आश्वासने दिली होती. मात्र, अद्यापही कारखाना चालू करण्याची प्रक्रिया होताना दिसत नाही. राज्य सहकारी बँकेचे कोट्यवधींचे कर्ज थकल्याने बँकेने कारखाना ताब्यात घेतला असून, आजही तो बँकेच्या ताब्यात आहे. निवडणुकीच्या प्रचारात केवळ आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात काहीही होत नाही. या भागातील शेतकरी, कामगार व व्यापारी यांच्यासाठी कारखाना चालू होणे गरजेचे आहे असे सभासदांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here