सोलापूर : थकीत ऊस बिलप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, कारखानदारांविरोधात आंदोलनाचा इशारा

सोलापूर : पुणे येथे झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करताना संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोलापूर जिल्ह्यातील थकीत ऊस बिलांचा प्रश्न गांभीर्याने मांडला. शेतीमालाला योग्य दर, वाढता उत्पादन खर्च, ऊस उत्पादकांची थकीत बिले, शेतकरी हिताची धोरणे आणि शासनाकडून प्रलंबित मागण्या यावर बैठकीत सविस्तर मंथन झाले. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले तत्काळ अदा करावीत, अन्यथा कारखानदारांविरोधात मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघटनात्मक ताकद वाढवून प्रभावी लढा उभारण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

विशेषतः ऊस उत्पादकांच्या थकीत बिलांचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर आंदोलनाची दिशा अधिक आक्रमक करण्याचे संकेत यावेळी देण्यात आले. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे रोखून ठेवणाऱ्या कारखानदारांना आता वेळ दिला जाणार नाही. थकीत ऊस बिले तत्काळ अदा केली नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना सोबत घेऊन निर्णायक लढा उभारेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघटना आक्रमक भूमिका घेईल, असे सांगण्यात आले. यावेळी राजू शेट्टी यांचा सोलापूर जिल्ह्याच्यावतीने सन्मान करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा संघटक युवराज घुले यांनी शेट्टी यांचा सन्मान केला. याप्रसंगी पुणे जिल्ह्यातील स्वाभिमानीचे नेते प्रकाश तात्या बालवडकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, अर्जुन मुदगुल, नाथा आयवळे यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here