सोलापूर : धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याकडील थकीत ऊस बिलांप्रश्नी अक्कलकोट येथे बैठक झाली. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, तहसीलदार किरण जमदाडे, कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे, अॅड. अमोल पाटील, बाळासाहेब मोरे, अरविंद घोडके आदी उपस्थित होते. कारखान्याकडे चालू थकीत रक्कम २० ते २२ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ही रक्कम सुमारे ५० कोटी असल्याचे समोर आले. बैठकीत आमदार कल्याणशेट्टी यांनी १५ दिवस प्रतीक्षा करण्याचा निर्णय सांगितला. या कालावधीत प्रश्न सुटण्याची शक्यता असून, तोडगा न निघाल्यास पुन्हा बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे असे आंदोलकांचे नेते अॅड. अमोल पाटील यांनी सांगितले.
गोकुळ शुगरकडील सन २०२३-२४ व २०२४-२५ हंगामातील थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी ऑगस्टपासून जिल्हा परिषद गेटसमोर आंदोलनाची घोषणा होती. मात्र, आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय झाला. कारखान्याकडील थकीत बिलाचा अंतिम आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. कारखाना सध्या न्यायालयीन प्रक्रियेत आहे. कारखान्यासंदर्भात एनसीएलटी न्यायालयात सुनावणी सुरू असून, खरेदीदाराच्या बाजूने निर्णय झाल्यास शेतकऱ्यांच्या थकीत बिलाचा प्रश्नही लवकर मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. कारखाना प्रशासनाने थकीत ऊस बिलाची रक्कम एक कोटी ९८ लाख रुपये असल्याचे सांगितले. मात्र, ही रक्कम एफआरपीशी संबंधित असल्याचे शेतकरी प्रतिनिधींचे म्हणणे आहे. त्यामुळे जाहीर केलेल्या दरानुसार प्रत्यक्ष किती रक्कम देणे बाकी आहे, याची निश्चित आकडेवारी समोर येणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.


















