कोल्हापूर : आर्थिक अडचणीतील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याची कार्यक्षमता व प्रशासनात नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे यांनी चालवला आहे. गेल्यावर्षी कारखान्याचे नुतनीकरण त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. अंतिम टप्प्यातील कामाला थोडा उशीर होत असताना रात्रंदिवस थांबून त्यांनी कामे पूर्ण करून घेतली. कारखान्याचे गाळप सुरू केले. नव्या-जुन्या मशिनरीमुळे चालू-बंद होणाऱ्या कारखान्यातून पावणेदोन लाख टन उसाचे गाळप झाले. मागील वर्षीच्या काही त्रुटी दूर करण्याचे काम आता त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले आहे. कोणत्याही स्थितीत यंदाचा हंगाम वेळेत सुरू करून ४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्याची त्यांची धडपड संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सुरू आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाने कारखान्याला गतवैभव मिळवून देण्याचे प्रयत्न त्यंनी चालवले आहेत.
अध्यक्ष प्रकाश पताडे राजकारण, शिक्षण क्षेत्रातही कार्यरत आहेत. शेतकऱ्यांप्रती असलेली भावना त्यांच्या कार्यातून पाहायला मिळते. पताडे यांचे वडील, शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते कै. धोंडिराम पताडे हेही ‘गोडसाखर’चे संचालक होते. आता प्रकाश यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. प्रकाश पताडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर सत्ता असताना विविध विकासकामे मार्गी लावली. शेतकरी, कर्मचाऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती यावी आणि कारखान्यालाही गतवैभव मिळावे म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून केलेल्या अर्थसहाय्याची जाण त्यांच्यासह संचालक मंडळाला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मुश्रीफ यांनी गट व गणातील राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार निवडून आणण्याची सोपविलेली जबाबदारी पताडेंनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.


















