पुणे : देशात साखरेचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे साखरेचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकारकडून उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या चालू हंगामात कारखान्यांनी एकूण साखर उत्पादनाच्या १० टक्के म्हणजेच ३० लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळवली आहे. मात्र यंदा प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये कमी पावसाचा ऊस पिकाला फटका बसत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या गाळप हंगामात इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा वापर कमी करून साखरेचे उत्पादन वाढविण्याचा सरकारचा विचार असल्याचे ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
देशात यंदा कमी पावसामुळे उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. अशातच साखरेचा भाव मागील दोन महिन्यांमध्ये १० टक्क्यांनी वाढून विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. हा दर आणखी तीन महिने टिकून राहण्याची शक्यता आहे. या काळात साखरेचा पुरवठा कमी राहून सणांमुळे मागणी वाढेल. याचा आधार साखरेच्या दराला असेल. त्यामुळे सरकार यंदा जास्त साखरेचे प्रमाण असलेल्या उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती थांबविण्यास कारखान्यांना सांगू शकते, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्याऐवजी कमी साखरेचे प्रमाण असलेल्या सी-हेवी मोलॅसिसपासूनच इथेनॉल निर्मिती करण्याची परवानगी कारखान्यांना मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तज्ज्ञांच्या मते साखर कारखान्यांना यंदा इथेनॉल निर्मितीपेक्षा साखर उत्पादन करून विकणे अधिक फायदेशीर ठरणार आहे.


















