धुळे : ऊसतोड कामगारांच्या योजनांसाठी विशेष नोंदणी मोहीम, माजी आ. कुणाल पाटील यांचा पुढाकार

धुळे : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी तालुक्यातील ऊसतोड कामगारांची मोफत नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आदिवासी दिनाचे औचित्य साधून या मोहिमेचा प्रारंभ हेंद्रुण (ता. धुळे) येथे माजी आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नोंदणी शिबिराला ऊसतोड कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गावात ऊसतोड कामगार नोंदणी शिबिरे घेण्यात येत असून, माजी आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे असे सांगण्यात आले. नोंदणी झाल्यानंतर कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार असून, त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास हातभार लागेल.

ऊस तोडणी कामगारांची नोंदणी करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तालुक्यातील प्रत्येकाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर असून, तालुक्याच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील आहोत. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. मात्र ऊसतोड कामगार कामानिमित्ताने परगावी जात असल्याने अनेकदा त्यांची शासनाकडे नोंदणी होत नाही आणि ते योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांच्या गावातच मोफत नोंदणी शिबिरे घेण्यात येत आहेत असे कुणाल पाटील यांनी सांगितले. माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील, बाजार समितीचे उपसभापती संभाजी राजपूत आदी उपस्थित होते. तालुक्यातील इतर गावांमध्येही अशाच पद्धतीने नोंदणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here