पुणे : घोडगंगा कारखान्यासाठी ‘एनएसडीसी’कडे कर्जाचा फेरप्रस्ताव देण्याची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सूचना

पुणे : मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज प्रस्तावाविषयी चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यावेळी प्रमुख उपस्थित होते. हा कारखाना शिरूर तालुक्याच्या अर्थव्यवस्थेची महत्त्वाची आधारवाहिनी आहे. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी. कारखान्याला आवश्यक अर्थसाहाय्य मिळण्यासाठी ‘एनएसडीसी’कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावातील त्रुटी तातडीने पूर्ण करून कर्ज मागणीचा प्रस्ताव नव्याने सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या.

गेल्या तीन गळीत हंगामांपासून कारखाना बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या शेतकरी, कामगार आणि इतर घटकांवर त्याचा परिणाम होत आहे. कारखाना सुरू झाल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या. कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, लघुउद्योजक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठी तातडीने उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली. संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कारखाना व्यवस्थापनाची बैठक त्वरित आयोजित करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. यासंदर्भात आयोजित बैठकीस राजेंद्र कोरेकर, रवी काळे, सुधीर फराटे, दादा पाटील फराटे, शशिकांत दसगुडे, राजेंद्र जगदाळे, बाळासाहेब नागवडे, स्वप्निल ढमढेरे, स्वप्नील गायकवाड, श्रीनिवास घाडगे, राजेंद्र गदादे, बाळासाहेब फराटे, महेश ढमढेरे, सोपानराव गवारी, शरदराव साठे, दादासाहेब कोळपे, कुंडलिकराव शितोळे, वीरेंद्र शेलार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here