अमरावती : इथेनॉलचा वापर ब्राझीलमध्ये १९७५ पासून होत आहे. भारतातही इथेनॉलचा वापर वाढल्यास परकीय इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. सध्या ‘इथेनॉल’बाबत प्रचंड गैरसमज निर्माण झाले आहेत, ते दूर करण्याची आवश्यकता आहे. साखरेची गरज पूर्ण झाल्यानंतर कारखान्यांनी उर्वरित उत्पादनातून ‘इथेनॉल’ निर्मितीला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शामराव देसाई यांनी येथे व्यक्त केले. श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात झुंबरलालजी करवा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९ व्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘इथेनॉलचे शेतीतील महत्त्व’ या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेशदास राठी छात्रालय समितीचे उपाध्यक्ष जुगलकिशोर गट्टाणी हे होते.
यावेळी देसाई यांनी इथेनॉलची निर्मिती ऊसासह मका, उंच वाढणारी गोड ज्वारी, तांदूळ यांसारख्या पिकांपासून करता येते. या पिकांची लागवड वाढवल्यास विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. इथेनॉलचे औद्योगिक व शेतीतील महत्त्व स्पष्ट करत इथेनॉलबाबत समाजात असलेल्या विविध समज-गैरसमजांवर भाष्य केले. तर अस्पा बंड सन्स प्रा. लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर रणजीत बंड यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे वाहनांचे नुकसान होते, हा गैरसमज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, योग्य प्रमाणात म्हणजेच २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर केल्यास कोणतीही मोठी अडचण निर्माण होत नाही. भविष्यात १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने तयार होण्याची शक्यता आहे. वाहनांचे आयुष्यमान संपल्यानंतर काही समस्या निर्माण होऊ शकतात. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे ‘मायलेज’मध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते; मात्र भविष्यातील इंधनव्यवस्थेच्या दृष्टीने इथेनॉल हा महत्त्वाचा पर्याय आहे. यावेळी प्रकाश हेडा, श्यामसुंदर दमानी, शोभा कमलनयन करवा आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार भांगडिया यांनी प्रास्ताविक केले. श्रमराज्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. आकीब देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.


















