कोल्हापूर : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत २४ ते २७ ऑगस्टअखेर मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे ४० वे वर्ष असल्याची माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली. स्पर्धा शाहू कारखाना कार्यक्षेत्रातील कागल, करवीर व हातकणंगले तालुके, उर्वरित कागल तालुका, गडहिंग्लज शहर तसेच उत्तूर आणि कडगाव-कौलगे जिल्हा परिषद मतदारसंघ या क्षेत्रापुरती मर्यादित राहणार आहे. यंदाच्या स्पर्धेत विविध ३८ वजनीगटांत मल्लांना आपले कौशल्य दाखविता येणार आहे. १४ वर्षांखालील बालगटात आठ, १६ वर्षांखालील कुमार गटात आठ, १९ वर्षांखालील ज्युनिअर गटात सात आणि वरिष्ठ पुरुष गटात पाच वजनीगट असतील. महिला कुस्तीगिरांसाठी २२ ते ७६ किलो वजन गटांतील दहा गटांत स्पर्धा होणार आहेत.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील प्रथम व द्वितीय क्रमांकासाठीच्या मल्लांना कुस्तीचे अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळावी, त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने याचे आयोजन केले आहे. बालगटातील स्पर्धकांची नावनोंदणी व वजन ता. २४ सकाळी ८.३० वाजता, कुमार व ज्युनिअर गटातील स्पर्धकांची नोंदणी व वजन ता. २५, तर महिला व वरिष्ठ पुरुष गटातील स्पर्धकांची नोंदणी व वजन ता. २६ रोजी सकाळी ८.३० वाजता कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. सर्व गटांतील अंतिम लढती दि. २७ रोजी सकाळी होतील. प्रत्येक वजनीगटातील प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. मल्लांनी संयोजकांशी संपर्क साधून नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.


















