नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यातर्फे ऊस उत्पादन वाढीसाठी रोपवाटिका तंत्रज्ञान प्रशिक्षण

नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि. आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय), मांजरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस रोपवाटिका तंत्रज्ञान व व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक संभाजी कडू पाटील होते. तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना ऊस रोपवाटिका उभारणी, प्रमाणित ऊस जातींची निवड, निरोगी व गुणवत्तापूर्ण ऊस रोपांची निर्मिती, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच आनुवंशिकदृष्ट्या शुद्ध ऊसरोपांची निर्मिती याबाबत शास्त्रशुद्ध व प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.

‘व्हीएसआय’चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग, वैज्ञानिक डॉ. समाधान सुरवसे, वैज्ञानिक राजेंद्र भोईटे, एआय तंत्रज्ञान तज्ज्ञ तुषार जाधव, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांतील २७ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने राबविलेल्या या उपक्रमामुळे कारखाना व शेतकरी यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन ऊस उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञानाला चालना मिळणार असून, भविष्यात ऊस उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होणार आहे, अशी माहिती मारोतराव गव्हाणे यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढवून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादनाला पुन्हा चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here