पुणे विभागात आडसाली ऊस लागवडीला पावसाचा फटका; सरासरी क्षेत्राच्या केवळ २२ टक्के लागवड

पुणे : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने पुणे विभागातील आडसाली ऊस लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. आतापर्यंत विभागात केवळ १ लाख ३ हजार ८२४ हेक्टर क्षेत्रावर आडसाली ऊस लागवड झाली असून, हे सरासरी क्षेत्राच्या अवघ्या २२ टक्के आहे. जुलैपासून पावसाला सुरुवात झाली असली, तरी अनेक भागांत जमिनीत अद्याप पुरेशी ओल नसल्याने लागवडीचा वेग मंदावलेला आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तसेच नगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यांत यंदा चांगला पाऊस झाला. त्यामुळे पानशेत, पवना, कळमोडी, चासकमान आणि नीरा देवघर यांसह काही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. उजनी धरणातही उशिराने समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण भरले असून, मुळा धरणात सुमारे ९० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे काही भागांत सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली असली, तरी संपूर्ण विभागातील परिस्थिती मात्र एकसमान नाही.

ChiniMandi WhatsApp Channel

ऊस हे शेतकऱ्यांना तुलनेने स्थिर उत्पन्न देणारे पीक मानले जाते. त्यामुळे दरवर्षी १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत आडसाली ऊस लागवडीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. मात्र, यंदा जूनमधील कमी पाऊस आणि त्यानंतर पूर्व भागात झालेली पावसाची उघडीप यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीऐवजी सोयाबीन, मूग आणि मका यांसारख्या कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना पसंती दिली आहे.

पुणे विभागातील उसाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ६९ हजार २०३ हेक्टर आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, संगमनेर, नेवासा आणि राहाता; पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, हवेली, जुन्नर आणि आंबेगाव; तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, अक्कलकोट, करमाळा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि माढा या तालुक्यांत ऊस लागवड झाली आहे.

मात्र, गतवर्षांच्या तुलनेत यंदा विभागातील आडसाली ऊस लागवडीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आहे. आडसाली लागवडीचा कालावधी संपत असताना आता पूर्वहंगामी आणि सुरू ऊस लागवडीचा हंगाम सुरू होणार आहे. पुढील काळात समाधानकारक पाऊस झाल्यास या लागवडींना काही प्रमाणात गती मिळण्याची शक्यता आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here