पुणे : येथील शिक्षक दाम्पत्याने आपली शेतीतील आवड कायम ठेवून विक्रमी ऊस उत्पादन घेण्याची कामगिरी साध्य केली आहे. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक असलेले शेतकरी संतोष सखाराम लबडे आणि अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नी सरस्वती लबडे यांनी एक एकर क्षेत्रात आडसाली उसापासून १३५ टन उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. भीमाशंकर साखर कारखान्याने ऊस तोडणी केली असून एक एकरातून एकूण १३४.८२ टन ऊस उत्पादन निघाले आहे. शाळेत अध्यापनाचे काम करत हे दाम्पत्य घरची शेतीसुद्धा उत्तम प्रकारे करत आहे. पाणी आणि खतांच्या अचूक व्यवस्थापनामुळे हे यश त्यांना मिळाले असल्याचे सांगण्यात आले.
लबडे दाम्पत्याच्या शेतातील एकेका उसाला ५५ ते ६० कांड्या होत्या. पारगाव येथीलच श्री जय हायटेक नर्सरीमधून त्यांनी २६५ जातीच्या उसाची तयार रोपे घेऊन १ जून २०२५ मध्ये एक एकर क्षेत्रात उसाची लागवड केली होती. आंंतरमशागत करू एकरी आठ ट्रॉली शेणखत आणि बेसल डोसचा वापर करून त्यांनी रोपांची लागवड केली. याबाबत संतोष लबडे यांनी सांगितले की, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सोमेश्वर दीक्षित, दिनकर आदक, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, संतोष थोरात, सचिन सैद यांचे मार्गदर्शन मिळाले. उसाला वेळोवेळी खते, पाणी यांचा वापर केला. पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. पीक घेताना राजलक्ष्मी अॅग्रोचे संतोष कुल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली औषधांचे योग्य प्रमाण, खते औषधांचे नियोजन, पाणी व्यवस्थापनामुळे एकरी सव्वाशे टनाहून अधिक उत्पादन घेऊ शकलो. परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी भागचंद पोंदे, कांताराम दातखिळे, दिलीप लोखंडे यांनी लबडे यांच्या शेतावर भेट देऊन चांगल्या उत्पादनाचे कौतुक केले.


















