पुणे : भीमा-पाटस दरम्यान, सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने दौंडची रणभूमी तापली आहे. आगामी काळात आरोप प्रत्यारोपांची उधळण होणार आहे. निवडणुकीच्या रणांगणात यावेळी आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यात अटीतटीचा सामना होणार काय, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार निवडणुकीची अधिकृत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. प्रवीण बागुल यांनी प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक प्रक्रियेतील पहिल्या महत्त्वाच्या टप्प्यात (दि.१९) ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर सभासदांना हरकती व आक्षेप नोंदवता येणार असून त्यासाठी दि.१९ ते दि. २८ ऑगस्ट हा कालावधी देण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक निधीसाठी सत्वशील शितोळे आणि वसंत साळुंखे यांनी ४० लाख १२ हजार रुपयांचा धनादेश पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाटस शाखेमार्फत प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग यांच्याकडे सुपूर्द केला आहे. निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. कारखान्याची निवडणूक ही ऑक्टोबरमध्येच होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन ऑक्टोबरमध्येच निवडणुकीचा बार उडणार आहे. त्यामुळे दौंडच्या रणभूमीत दसरा आणि दिवाळीतच राजकीय फटाके फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता प्रारूप मतदार यादीवर प्राप्त हरकती व आक्षेपांवर ७ सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्यात येणार असून त्यानंतर ११ सप्टेंबरपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.


















