पडळ साखर कारखाना प्रगतीपथावर; पुढील हंगामापर्यंत बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार : आ. मनोज घोरपडे

सातारा : माजी आमदार व चेअरमन प्रभाकर घार्गे यांच्या काटेकोर आर्थिक नियोजनामुळे पडळ साखर कारखाना प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे को-चेअरमन आ. मनोज घोरपडे यांनी केले. पडळ (ता. खटाव) येथील पडळ साखर कारखान्याच्या आठव्या गळीत हंगामाचा शुभारंभ व रोलर पूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चेअरमन प्रभाकर घार्गे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, संचालक कृष्णकांत शेडगे, महेश घार्गे, अमोल पवार, महेश चव्हाण, हणमंत घोरपडे, जनरल मॅनेजर काकासाहेब महाडिक, अजयकुमार सानप उपस्थित होते.

आ. मनोज घोरपडे म्हणाले, पडळ कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतीला टेंभू योजनेचे पाणी मिळणार आहे. या योजनेमुळे आणखी ४० ते ५० गावांची पाण्याची गरज भागणार आहे. इथेनॉल प्रकल्पानंतर आता कारखान्यात कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पुढील गळीत हंगामापर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. अल निनोच्या प्रभावामुळे पावसावर परिणाम झाला असला तरी जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणे भरली आहेत. त्यामुळे येरळवाडी धरण व टेंभू प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी आणण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

भविष्यात आणखी ४० ते ५० गावांना त्याचा लाभहोणार असून, लवकरच पावसावर अवलंबून न राहता शाश्वत पाण्यावर शेती करण्याचे स्वप्न साकार होईल. योग्य नियोजनामुळे कारखाना सातत्याने प्रगती करत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभाकर घार्गे म्हणाले, सरकारी धोरणे, पाण्याचा प्रश्न, ऊस उत्पादनातील अडचणी आणि अवेळी पाऊस अशा विविध संकटांना सामोरे जात कारखाना यशस्वी वाटचाल करत आहे. कर्मचारी व वाहतूकदारांना वेळेवर पगार, काटकसर, आर्थिक शिस्त आणि शेतकऱ्यांचा विश्वास यामुळे कारखान्याने नावलौकिक मिळवला आहे.

इतर कारखाने विविध आमिषे दाखवून ऊस नेत असले तरी आपल्या भागातील हक्काच्या आणि वेळेवर पैसे देणाऱ्या कारखान्याला शेतकऱ्यांनी ऊस द्यावा. गत सात वर्षांत कोणत्याही शेतकऱ्याचे ऊस बिल थकीत राहिलेले नाही. शेतकऱ्यांना योग्य दर देण्यासाठी कारखाना कटिबद्ध आहे, असेही घार्गे यांनी सांगितले. कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांनी कारखान्यात दिवसाला १२ मेट्रिक टन बायोगॅस निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. यावेळी कारखाना अधिकारी किरण पवार, विजय यादव, अजित मोरे, सुहास तांबे, योगेश निंबाळकर, शरद पवार, अधिक लाड, नितीन शितोळे, मल्हारी नाकाडे यांच्यासह कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here