सोलापूर : माढा तालुक्यातील काही भागांत उसाची वाढ अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पाने पिवळसर व सुकलेली दिसत आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिकांची वाढ आणि उत्पादनावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत असल्याने तेही आर्थिक अडचणीत आहेत. काही ठिकाणी पीक विरळ झाले असून तण वाढले आहे. उपलब्ध पाण्यावर पीक तग धरून असले तरी पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास ऊस उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ऊसाला सात-आठ महिने झाले आहेत; मात्र अद्याप उसाने कांडीही बांधलेली नाही. पावसाअभावी आणि ओलावा नसल्याने पिकाची वाढच खुंटली आहे. पुढे उसाची वाढ कशी होणार आणि उत्पादन कसे मिळणार, याची चिंता शेतकऱ्यांना आहे.
माढा तालुक्यातील ऊस शेतीवर पावसाने ओढ दिल्याने संकटाचे सावट निर्माण झाले आहे. अनेक भागांत उसाची वाढ खुंटली असून पाने सुकू लागली आहेत. त्याचा परिणाम सर्वत्र दिसू लागला आहे. यंदा शेतकरी खत व औषधांची खरेदीही कमी प्रमाणात करताना दिसत आहेत असे शिवशंभू अॅग्रो सर्व्हिसेसचे सागर लटके यांनी सांगितले. तर केवड येथील शेतकरी सागर धर्मे यांनी म्हणाले की, गेल्यावर्षी पूर परिस्थितीने नुकसान झाले, तर यंदा दुष्काळसदृश परिस्थितीने अडचण निर्माण केली आहे. सलग दोन वर्षांच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. यंदा एकरी केवळ १५ ते २० टन ऊस उत्पादन मिळण्याची शक्यता असून आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. शासन आणि संबंधित यंत्रणेने तालुक्यातील पिकांच्या परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.


















