लातूर : रेणा सहकारी साखर कारखान्याची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. २२) लातूर येथील वैष्णव हॉटेल येथे झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी रेणाचे चेअरमन अनंतराव ठाकूर-देशमुख होते. यावेळी माजी आमदार वैजनाथदादा शिंदे, अॅड, त्र्यंबक भिसे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, आबासाहेब पाटील, सर्जेराव मोरे यांच्यासह संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. आगामी गाळप हंगामात कारखाना गतवर्षीच्या तुलनेत उसाला प्रतिटन १०० रुपये अधिक भाव देणार असल्याची घोषणा माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी यावेळी केली.
दिलीपराव देशमुख म्हणाले की, मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी नेहमीच सर्वाधिक भाव दिला असून, या कारखान्यांनी शासनाचे कोणतेही पॅकेज घेतलेले नाही. शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवूनच कारखान्यांचा कारभार केला जात आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विश्वासाच्या बळावर मांजरा परिवाराने सर्वांगीण विकासाचा घेतलेला मार्ग यापुढेही कायम राहील. अनेक साखर कारखान्यांमध्ये ऊस बिलासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागते. मात्र, मांजरा परिवारातील कारखान्यांबाबत अशी स्थिती नाही. केंद्र व राज्य सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. मात्र, आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय आणि दिलेला शब्द कधीही मोडलेला नाही, असे ते म्हणाले. यावेळी कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे यांनी अहवालाचे वाचन केले. चेअरमन अनंतराव ठाकूर-देशमुख यांनी कारखान्याच्या २४ वर्षांच्या प्रगतीचा आढावा मांडला.


















