सातारा : सध्या बाजारपेठेत साखरेच्या दरात वाढ झाली असून, किलोमागे सुमारे ७० ते ७२ रुपयांपर्यंत साखरेची विक्री होत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना चांगला आर्थिक फायदा होत असताना त्याचा योग्य वाटा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका रयत संघटनेने मांडली आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा वाढीव मोबदला द्यावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक लोहार यांनी केली. ऊस उत्पादकांच्या हिताचा विचार करून कारखानदारांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्ष लोहार यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी २०२५-२६ गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम अदा केली आहे. मात्र, सध्या जागतिक तसेच देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला चांगला दर मिळत आहे. साखरेच्या वाढलेल्या दरानुसार ‘७०:३०’ फॉर्म्युल्याप्रमाणे शेतकऱ्यांना अद्याप काही रक्कम मिळणे बाकी आहे. त्यामुळे प्रत्येक कारखान्याने एफआरपीव्यतिरिक्त प्रति टन एक हजार रुपये शेतकऱ्यांना तातडीने द्यावेत. रक्षाबंधनापूर्वी वाढीव रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी लोहार यांनी केली.


















