अहिल्यानगर: जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुका उसाचे आगर मानला जातो. मात्र, यावर्षी तालुक्यातील ऊस पिकावर पायरीला किडीने हल्ला चढवला आहे.पायरीला ही रस शोषणारी कीड आहे. ही कीड उसाच्या पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे उसाची वाढ आणि उत्पादन दोन्हींवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस गुऱ्हाळांना देण्याचा धडाका लावला आहे. तालुक्यातील घोड, भीमा व कुकडी पट्टयातही उसाचे क्षेत्र आहे. या सगळ्या भागात पायरीला किडीने हल्ला चढवला आहे. ही कीड रोखण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच फवारणीसाठी ड्रोन वेळेत उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ऊस वाढीच्या अवस्थेत पायरीला किडीच्या प्रादुर्भावामुळे ऊस पिकाचे नुकसान होत आहे. नाईलाजास्तव ऊस गुऱ्हाळाला देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. पायरीला किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी चांगलेच वैतागले आहेत. मंगळवारी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी थेट कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोनवरून संपर्क साधून या किडीच्या प्रादुर्भावाबाबत कैफियत मांडली. त्यावर मंत्री भरणे यांनी कृषी आयुक्तांना तातडीने सूचना करून उद्यापासून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठविण्याचे व नुकसानीची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. कारखाने सुरू व्हायला अजून काही महिने वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वैतागून गुऱ्हाळांना ऊस देण्याचा धडाका लावला आहे. मागील पंधरवड्यात ऊस तोडला गेला आहे. अजूनही तोड सुरू असल्याचे दिसून येते.


















