पुणे : इथेनॉलमुळे साखर उद्योगाला नवी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे देशाच्या कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होऊ शकते, परकीय चलनाची बचत होऊ शकते आणि ग्रामीण भागात उद्योग व रोजगार निर्माण होऊ शकतात. मात्र या राष्ट्रीय लाभाचा मूळ उत्पादक असलेल्या शेतकऱ्याला प्रत्यक्ष फायदा मिळणे आवश्यक आहे. इथेनॉलचे दर, खरेदी करार आणि कारखान्यांचे उत्पन्न यामध्ये पारदर्शकता असावी. इथेनॉलमधून अतिरिक्त महसूल मिळाल्यास त्यातील निश्चित हिस्सा ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा झाला पाहिजे, अशी अपेक्षा शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारीणीचे सदस्य विलास ताथोड यांनी व्यक्त केली आहे. शेतकरी फक्त कच्चा माल पुरवणारा मजूर नसून संपूर्ण जैवऊर्जा उद्योगाचा भागीदार झाला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत आपली भूमिका मांडताना विलास ताथोड यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्याला कोणत्या कारखान्याला ऊस विकायचा, कोणत्या व्यापाऱ्याशी करार करायचा, गूळ किंवा इतर उत्पादनासाठी ऊस द्यायचा, की स्वतः प्रक्रिया उद्योग उभारायचा, याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. कारखान्यांमध्ये शेतकऱ्याचा ऊस मिळवण्यासाठी खरी स्पर्धा निर्माण झाली, तर चांगला दर, वेळेवर तोडणी, अचूक वजन आणि तत्पर देयक देणे कारखान्यांना भाग पडेल. शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला दिल्यानंतर त्याला वेळेत पैसे मिळणे हा त्याचा कायदेशीर आणि नैतिक अधिकार आहे. प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना उसाची रक्कम मिळण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. या काळात त्याला पुढील पिकासाठी खते, बियाणे आणि कीडनाशके खरेदी करावी लागतात. यासह घरखर्च, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे आरोग्य आणि जुन्या कर्जाचे हप्ते भरावे लागतात. त्यामुळे त्याला पुन्हा कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे ऊस बिले निश्चित मुदतीत मिळायला हवीत. साखर आणि इथेनॉलच्या विक्रीतून येणाऱ्या रकमेत ऊस उत्पादकांच्या देयकाला प्रथम प्राधान्य देणारी सुरक्षित व्यवस्था असायला हवी. ग्राहकाला स्वस्त साखर देण्याची जबाबदारी सरकारची असेल, तर त्यासाठी शेतकऱ्यांच्या खिशातून अप्रत्यक्ष कर वसूल करता कामा नये. गरजू ग्राहकांना थेट मदत द्यावी. परंतु शेतीमालाचा भाव पाडून त्याचा भार उत्पादकावर टाकू नये असे मत ताथोड यांनी व्यक्त केले.


















