अहिल्यानगर : साखरेच्या बाजारभावात सध्या मोठी वाढ झाली आहे. कारखान्यांना साखर विक्रीसोबतच इथेनॉल, मोलॅसिस, बगॅस व सहवीज निर्मितीतूनही उत्पन्न मिळते. या वाढीव उत्पन्नाचा योग्य हिस्सा ऊसउत्पादक सभासद शेतकऱ्याला मिळावा, म्हणून तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखान्यांनी पोळ्यापूर्वी सभासद शेतकऱ्यांना वाढीव अंतरिम पेमेंट द्यावे, दिवाळीपूर्वी पुन्हा अतिरिक्त हप्ता जाहीर करावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे व सहकाऱ्यांनी केली आहे.
याबाबत शहराध्यक्ष पारखे यांनी म्हटले आहे की, साखर विक्री, रिकव्हरी, इथेनॉल व उपपदार्थांच्या उत्पन्नाचा पारदर्शक हिशेब सभासदांसमोर ठेवावा, प्रतिटन किती अतिरिक्त रक्कम देणार, याची ठोस घोषणा करावी. कारखाना शेतकऱ्याच्या उसावर चालतो. त्यामुळे साखरेच्या दरवाढीचा फायदा फक्त कारखान्याच्या ताळेबंदात दिसून चालणार नाही, तो ऊस उत्पादकांच्या खात्यातही दिसला पाहिजे. पोळा आणि दिवाळीच्या तोंडावर तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यांनी सभासद शेतकऱ्यांना वाढीव पेमेंट द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.


















