पुणे : जिल्ह्यातील काही भागात उसावर फवारणीला ड्रोन वापराला शेतकऱ्यांचे प्राधान्य

पुणे: आंबेगाव पूर्व भागातील ऊस क्षेत्र मोठे असल्याने या परिसरात बिबट्यांचा वावरही मोठ्या प्रमाणावर आढळतो. अनेकदा दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत असल्याने शेतकामांवर त्याचा परिणाम होतो. अशा परिस्थितीत ड्रोनद्वारे उसावर औषध, किटकनाशके फवारणी करण्यास प्राधान्य दिले जात आहे. यापूर्वी शेतकरी पाठीवर पंप घेऊन ऊस पिकावर फवारणी करीत होते. त्यासाठी अधिक वेळ आणि मजुरी खर्च होत होता. मात्र, ड्रोनद्वारे फवारणीची सुविधा उपलब्ध झाल्याने हे काम जलद आणि सोपे झाले आहे. त्यातून शेतकऱ्यांचे काम कमी होण्यासह बिबट्याच्या संभाव्य धोक्यापासूनही काही प्रमाणात बचाव होत आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात ऊस लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. हा परिसर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादन घेतले जाते. या भागातील शेतकरी ऊस पिकावर औषध फवारणीसाठी ड्रोन यंत्राला पसंती देत आहेत. कमी वेळेत अधिक क्षेत्रावर फवारणी करता येत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि मजुरीचा खर्च वाचत आहे. हा परिसर बिबटा प्रवण क्षेत्र असल्याने शेतात मनुष्यबळ कमी ठेवून फवारणी करता येत असल्यानेही ड्रोन फायदेशीर ठरत आहे. ड्रोनच्या साहाय्याने अवघ्या ५ मिनिटांत सुमारे एक एकर क्षेत्रावर फवारणी करता येते. त्यासाठी शेतकऱ्यांना एकरी ७०० रुपये खर्च येतो. त्यामुळे कमी वेळेत मोठे क्षेत्र होत असल्याने शेतकरी ड्रोन फवारणीला प्राधान्य देत आहेत. सध्या ठिकठिकाणी ऊस पिकावरील ड्रोनद्वारे औषध फवाारणी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here