सातारा : सोलापूर येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पाडेगाव येथे असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राला भेट दिली. या प्रगतशील शेतकऱ्यांना एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने ८७ टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रावर विकसित केलेले वाण फुले ०२६५ व को ८६०३२ या दोन वाणांचा प्रमुख वाटा असल्याची माहिती डॉ. सुरेश उबाळे यांनी दिली. संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र भिलारे यांनी केंद्राची माहिती दिली.
यावेळी डॉ. दत्तात्रय थोरवे यांनी शेतकऱ्यांना सुपरकेन नर्सरी व एक डोळा लागवड तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले. ऊस संशोधन केंद्राने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजवर १७ वाण व ११० ऊस उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी केल्या असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी प्रक्षेत्र भेटही दिली. ऊस विकास अधिकारी दीपक नलावडे यांनी ऊस उत्पादनाबाबत माहिती दिली. जिल्हा विस्तार केंद्राचे प्रमुख डॉ. किरणकुमार ओंबासे, राजेंद्र पांढरे, अजित विधाते यांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले.


















