लातूर : लातूर तालुक्यातील काही भागात पाण्याच्या ताणामुळे अनेक ठिकाणी पिके माना टाकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ऑगस्टचा शेवट आला तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ऊस पिकालाही पाण्याच्या ताणाचा मोठा फटका बसला आहे. वाढीच्या महत्त्वाच्या काळात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने उसाची उंची व जाडी वाढण्याची प्रक्रिया मंदावली आहे. परिणामी, उसाच्या वजनावर तसेच पुढे साखर उताऱ्यावरही परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आधी पावसाची अनिश्चितता, त्यानंतर पावसाने दिलेला दगा आणि आता बदलत्या वातावरणामुळे अळी व रोगांचा वाढता प्रादुर्भाव अशा दुहेरी-तिहेरी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पावसाने दडी मारल्याने सोयाबीनसह इतर खरीप पिकेही संकटात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सोयाबीन पिकावर विविध प्रकारच्या अळी व रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. काही भागात सोयाबीन पीक फुलोऱ्यात आहे, तर अनेक शेतांमध्ये शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी दाणे भरण्याची अवस्था सुरू असून, हा पिकासाठी अत्यंत निर्णायक टप्पा आहे. मात्र, याच काळात पावसाने दडी मारल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. येत्या आठवड्यात पुरेसा पाऊस न झाल्यास सोयाबीन पीकही हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. परिसरातील काही भागात सोयाबीनवर यलो मोझेंकसारख्या रोगांचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. पावसाअभावी परिसरातील पाण्याचे स्रोतही कोरडे पडत असून शेतीबरोबरच पशुधन जगवण्याचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे. परतीचा पाऊसही वेळेवर आणि समाधानकारक झाला नाही, तर आगामी रब्बी हंगामावरही संकट येण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.


















