पुणे : नागरगावच्या गुऱ्हाळमालकाकडून प्रतिटन ४,३०० रुपये ऊस दर जाहीर, शेतकऱ्यांकडून स्वागत

पुणे : नागरगाव येथे झालेल्या शेतकरी एल्गार सभेत उसाच्या दराबाबत चर्चा सुरू असतानाच गुऱ्हाळमालक एकनाथ शेलार यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या उसाला ४३०० रुपये प्रतिटन बाजारभाव देणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थित शेतकऱ्यांनी स्वागत केले. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने एकनाथ शेलार यांचा सत्कार करण्यात आला. उसाला अपेक्षित दर मिळावा, यासाठी गेल्या तीन दिवसांपासून शिरूर आणि दौंड तालुक्यात गावोगावी शेतकरी एल्गार सुरू असून शेतकऱ्यांच्या एकजुटीचा परिणाम आता दिसून येत आहे. जोपर्यंत जादा दर जाहीर केला जात नाही, तोपर्यंत ऊस पुरवठा न करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

नागरगांव येथे झालेल्या शेतकरी एल्गार सभेत उसदराची कोंडी फुटली. गुऱ्हाळमालक एकनाथ शेलार यांनी शेतकऱ्यांच्या उसाला ४३०० रुपये प्रतिटन दर देण्याची घोषणा केली. मात्र इतर अनेक ठिकाणी गुऱ्हाळमालक अनुपस्थित असल्याचे दिसून येत आहे. रांजणगाव येथे झालेल्या शेतकरी एल्गार सभेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. अपेक्षित दर मिळाला नाही, तर सध्या सुरू असलेल्या ऊसतोडी वगळता ५ सप्टेंबरपर्यंत ऊसतोड बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय या सभेत घेण्यात आला होता. मांडवगण येथेही सभा घेण्यात आली. सभेत उसाला किमान ५००० रुपये प्रतिटन दर मिळाला पाहिजे, अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली. पारगाव येथेही शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. दरम्यान, साखरेचा दर बदलत असल्याने चिंता वाढली आहे. ७० रुपये साखरेचा दर ६२ रुपयांवर आला असून, गुळाचा दर ६५ रुपयांवरून ५२ ते ५५ रुपयांपर्यंत खाली आल्याने उसाचे दर निश्चित करणे अवघड जात आहेत. ऊस तोडणीनंतर पुढील १५ दिवस पुन्हा दर ठरविता येत नाही. बाजार स्थिर होतील, त्यावेळी निर्णय योग्य राहील, अशी माहिती गुऱ्हाळमालकांकडून मिळत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here