पुणे : ऊसतोडणी मजूर, मुकादम व वाहतूक कंत्राटदाराकडून ऊस तोडणीकरिता पैशांची मागणी होत असल्यास योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सर्व साखर कारखान्यांना दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांकडून तक्रारी आल्यास सात दिवसांच्या आत त्याचे निराकरण करावे. कारखान्याचे कार्यकारी संचालक, सरव्यवस्थापकांना त्यामध्ये तथ्य आढळल्यास ती रक्कम मजूर, मुकादम अथवा वाहतूक कंत्राटदार यांच्या बिलातून वसूल करून संबंधित शेतकऱ्यांना द्यावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
साखर आयुक्तांनी २७ ऑगस्टला एक परिपत्रक जारी केले असून, त्यामध्ये कारवाईच्या बाबी स्पष्ट केलेल्या आहेत. ऊसतोडणी मजूर, मुकादम व वाहतूक कंत्राटदार यांच्याकडून ऊसतोडणी करताना पीक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊसक्षेत्र अडचणीचे आहे. ऊसतोडणी करणे परवडत नाही, अशी विविध कारणे सांगून ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख पैशांची व अन्य वस्तू किंवा सेवा यांची मागणी केली जाते.
ऊसतोडणी मजूर व मुकादम यांच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांनी पैसे दिले नाही तर ऊसतोडणीस टाळाटाळ केली जाते, अशा प्रकारच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून वारंवार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना जारी केल्या. शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही, याबाबत शंका घेऊन ऊस लवकर गाळपास जावा यासाठी अनुचित मार्गाचा अवलंब करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
…अशी रोखावी शेतकऱ्यांची पिळवणूक –
सर्व साखर कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकरणातील गैरव्यवहारांना आळा बसवावा.
शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी मोबाईल फोन, व्हॉटसअॅप क्रमांक जारी करावा.
सर्व सहकारी कारखान्यांचे कार्यकारी संचालक व खासगी कारखान्यांच्या सरव्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यास प्राधान्य द्यावे.
त्यामध्ये तक्रारींचे निवारणासाठी कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करावी.
तक्रार निवारण अधिकारी यांचे नाव, संपर्क मोबाईल नंबर याची माहिती ऊसतोडणी होत असलेल्या गावात कारखान्याच्या गट ऑफिसवर व ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी.
साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांनी घटना घडल्यावर लेखी स्वरूपात तक्रार लगेच तक्रार करून त्याची पोहोच घ्यावी.
चालू हंगामात ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, यासाठी कारखान्यांनी दक्षता घ्यावी.



















manager film man mukadam use todni majur sagdi Mera Le li aaheit shetkari pilavnuk nahi