धाराशिव : श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ च्या आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात साधारणपणे १८ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. पाऊस अपुरा झाला असला, तरी कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध आहे. आगामी हंगामात कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे वेळेवर गाळप केले जाईल असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार बसवराज पाटील यांनी केले. मुरुम येथे कारखाना कार्यस्थळावर आगामी गळीत हंगामासाठीचा रोलरपूजन सोहळा शुक्रवारी (ता. २८) पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
बसवराज पाटील म्हणाले की, गळीत हंगामासाठी वाहतूक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. मशिनरी दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस द्यावा, असे आवाहन अध्यक्ष पाटील यांनी यावेळी केले. रोलर पूजन सोहळ्यास मुरूम नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरण पाटील, कारखान्याचे संचालक शरणप्पा पत्रिके, केशवराव पवार, शिवलिंग माळी, रवींद्र चव्हाण, गणेश अंबर, नागनाथ पत्रिके, अॅड. विश्वनाथ पत्रिके, सुजित शेळके, बबन बनसोडे, सतीश पवार, संजीव पाटील, शाहूराज डोके, प्रकाश आष्टे, सचिन पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन रेड्डी (चाकूर), उमाकांतप्पा शेटे, कार्यकारी संचालक एस. आर. गवसाणे आदी उपस्थित होते.


















