बेळगाव : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत ‘अधिकारी आपल्या बांधावर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचे सभासद शेतकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. कारखान्याचे अधिकारी विविध गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन ऊस लागवड, पीक व्यवस्थापन, आंतरपीक पद्धती तसेच उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन करीत आहेत. प्रत्यक्ष शेतावर मिळणाऱ्या या मार्गदर्शनाचा फायदा होत आहे.
श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची ऊस विकास योजना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विश्वजीत पाटील यांनी आडी (ता. निपाणी) येथील शेतकरी सचिन पाटील यांच्या ऊस प्लॉटची पाहणी केली. यावेळी त्यांनी पाटील यांच्या आंतरपिक घेण्याच्या पद्धतीचे कौतुक केले. ऊस पिकाबरोबरच कमी कालावधीत अतिरिक्त उत्पन्न मिळवून शेतीची आर्थिक उत्पादकता वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.
ऊस विकास अधिकारी विश्वजीत पाटील म्हणाले की, ऊस पिकाच्या दोन सरींतील चार फूट उपलब्ध जागेचा योग्य वापर करून सुरुवातीच्या काळात भाजीपाला पिकांचे आंतरपीक घ्यावे. ऊस लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात दोन सरींमधील चार फूट जागा काही काळ मोकळी राहते. या जागेचा नियोजनबद्ध वापर करून कोबीसारखी भाजीपाला पिके आंतरपीक म्हणून घेतल्यास शेतकऱ्यांना कमी कालावधीत उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे एकाच क्षेत्रातून ऊस उत्पादनाबरोबरच अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होण्यास मदत होते असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन करणे आणि त्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढविणे, हाच ऊस विकास योजनेचा मुख्य उद्देश आहे, असे विश्वजीत पाटील यांनी सांगितले. यावेळी शरद बन्ने, स्लिप बॉय शुभम पाटील, बाळगोंडा पाटील (इस्पुर्ले), भीमगोंडा पाटील, राजू पाटील आदी उपस्थित होते.


















