पुणे : एकाच जमिनीत सातत्याने ऊस लागवड करणे, सेंद्रिय खतांचा अपुरा वापर, रासायनिक खतांचा असमतोल, अयोग्य सिंचन व्यवस्थापन आणि पीक अवशेषाचा योग्य पुनर्वापर न केल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा साठा कमी होताना दिसून येतो. परिणामी, जमिनीची सुपीकता, अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि उत्पादनक्षमता यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय पदार्थांचा नियमित पुरवठा आणि सूक्ष्मजीवांची सक्रियता यांचा योग्य समन्वय साधल्यास जमिनीचे जैविक आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञ डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. अशोक कडलग, प्रणाली ढेकाणे यांनी व्यक्त केले आहे. शेणखत, कंपोस्ट, उसाचे पाचट, हिरवळीचे खत यासारख्या सेंद्रिय स्रोतांसोबत जीवामृत, घनजीवामृत आणि सेंद्रिय स्लरी आदी जैविक निविष्ठांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास जमिनीतील सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढविण्यास मदत होते, अशी सूचना त्यांनी केली आहे.
सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या आरोग्याचा आणि सुपीकतेचा महत्त्वपूर्ण निर्देशक आहे. तो जमिनीची संरचना, जलधारण क्षमता, सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता, अन्नद्रव्यांची उपलब्धता यावर परिणाम करतो. माती परीक्षणाच्या आधारे जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी निश्चित केली जाते. साधारणपणे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.२० टक्क्यापेक्षा कमी असल्यास अत्यंत कमी, ०.२१ ते ०.४० टक्का असल्यास कमी, ०.४१ ते ०.६० टक्का असल्यास मध्यम, ०.६१ ते ०.८० टक्का असल्यास मध्यम जास्त, ०.८१ ते १.०० टक्का असल्यास जास्त आणि १.०० टक्क्यापेक्षा अधिक असल्यास खूप जास्त असे वर्गीकरण केले जाते. सतत एकाच पिकाची लागवड, सेंद्रिय खताचा अपुरा वापर, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, ऊस पाचट जाळणे, पीक अवशेष शेताबाहेर काढणे, अयोग्य मशागत, अयोग्य सिंचन व्यवस्थापन या गोष्टी कर्ब कमी होण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता टिकवणे, अन्नद्रव्यांचे खनिजीकरण या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. यासाठी उसाचे पाचट जाळू नये. त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करावे. कुजलेले शेणखत व कंपोस्ट यांचा वापर करावा, हिरवळीच्या पिकांचा योग्य पद्धतीने खत म्हणून वापर करावा, जिवामृत, घन जिवामृत व सेंद्रिय स्लरी यांचा शिफारशीनुसार वापर करावा, माती परीक्षणाच्या आधारे संतुलित खत व्यवस्थापन करावे आणि पीक फेरपालट व आंतरपीक पद्धतींचा अवलंब करावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.


















