पुणे : आगामी २०२६-२७ चा ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच साखर कारखान्यांमधील ऊस वजनकाट्यांची प्रशासनाकडून काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे. वजनकाट्यांमध्ये फेरफार करून ऊस वजनात तफावत केली जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथके स्थापन करून कारखान्यांच्या वजनकाट्यांची अचानक तपासणी करण्याचे आदेश साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
शेतकरी संघटनांकडून काटामारीच्या सातत्याने तक्रारी
साखर कारखान्यांमधील शेतकरी वजनकाट्यांबाबत विविध शेतकरी संघटनांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत, जिल्ह्यातील कार्यरत साखर कारखान्यांच्या संख्येनुसार तालुकानिहाय किंवा जिल्हास्तरावर भरारी पथके स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भरारी पथकांमध्ये महसूल विभाग, पोलिस, वैधमापनशास्त्र विभाग, माहिती-तंत्रज्ञान तज्ज्ञ, प्रादेशिक सहसंचालक (साखर) आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश केला जाणार आहे.
पूर्वसूचना न देता अचानक तपासणी
भरारी पथकांनी कारखाना प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक भेट देऊन वजनकाट्यांची तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. ऊसाचे वजन केल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य वजनाची पावती दिली जाते की नाही, याचीही तपासणी करण्यात येणार आहे.वजनाबाबत गैरप्रकाराची तक्रार प्रशासन किंवा पोलिसांकडे प्राप्त झाल्यास संबंधित कारखान्याच्या वजनकाट्याची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश आहेत. तपासणीदरम्यान दोष किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
पथकांची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार
भरारी पथकातील सदस्यांची नावे आणि त्यांचे संपर्क क्रमांक कारखाना प्रशासनासह शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होतील, अशा पद्धतीने प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच भरारी पथकांसाठी आवश्यक वाहनांची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांनी करावी. तपासणीदरम्यान केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल साखर आयुक्तालयाकडे सादर करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
‘कॅलिब्रेशन’नंतर वजनकाट्यांना सील बंधनकारक
ऊस वजनकाट्यांच्या ‘कॅलिब्रेशन’मध्ये (मापनयंत्राची अचूकता तपासण्याची प्रक्रिया) फेरफार करून वजनात तफावत केली जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर वैधमापन अधिकाऱ्यांनी वजनकाट्यांची तपासणी करून त्यांचे कॅलिब्रेशन केल्यानंतर वजनकाटे सील करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडताना शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वजनाबाबत पारदर्शकता राखण्यास मदत होणार आहे.


















