अहिल्यानगर : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने दडी मारल्याने ऊसशेती अडचणीत आली आहे. तीन महिन्यांहून अधिक काळ समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक भागांत उसाची पाने वाळून ऊस करपण्यास सुरुवात झाली आहे. उपलब्ध पाण्यावर पीक तग धरत असतानाच दमट आणि उष्ण वातावरणामुळे आता पायरी किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी पाणीटंचाई आणि किडीचे संकट अशा दुहेरी कोंडीत सापडले आहेत.
बोधेगाव कृषी मंडळाच्या कार्यक्षेत्रात सुमारे २६ गावे असून, एकूण २४ हजार २९३ हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने विहिरी, कूपनलिका तसेच इतर जलस्रोतांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. परिणामी, उसाला आवश्यक प्रमाणात पाणी देणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही.
पाण्याअभावी अनेक शेतांमध्ये उसाची पाने वाळत असून, काही ठिकाणी ऊस करपण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आधीच पाण्याची कमतरता असताना त्यात किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.पावसाची दडी आणि पायरी किडीचा वाढता प्रादुर्भाव यामुळे काही भागांत उसाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. ऊस क्षेत्र आणि उत्पादन कमी झाल्यास आगामी गळीत हंगामात स्थानिक साखर कारखान्यांनाही ऊसटंचाईला सामोरे जावे लागू शकते.
रसशोषक किडीमुळे खुंटते उसाची वाढ
पाण्याअभावी वाढ खुंटलेल्या उसावर आता पायरी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही रसशोषक कीड असून तिची पिल्ले आणि प्रौढ कीटक उसाच्या पानांमधील रस शोषून घेतात.त्यामुळे पानांचा रंग पिवळसर होऊन पाने वाळू लागतात, तसेच उसाची वाढ मंदावते. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यास उसाच्या वाढीवर आणि अंतिम उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.पावसाअभावी निर्माण झालेली पाणीटंचाई आणि त्यात वाढलेला किडीचा प्रादुर्भाव यामुळे शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर पीक वाचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.


















