सोलापूर : जाहीर केलेला ऊस दर न देणाऱ्या कारखान्यांविरोधात आंदोलनाचा मंगळवेढ्यात ऊसदर समितीचा निर्णय

सोलापूर : गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी ऊस दरासाठी आंदोलन केल्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील दामाजी, युटोपियन, भैरवनाथ आणि फॅबटेक या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना प्रति टन ३००० रुपये ऊसदर देण्याचे आश्वासन दिले होते. यापैकी ज्या साखर कारखान्यांनी निश्चित केलेला ऊसदर देण्याचे लेखी आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे दर दिलेला नाही, त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय येथील ऊसदर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पोळा आणि दिवाळी या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रति टन २०० रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता तातडीने वर्ग करावा, अशी मागणी समितीने केली. नवीन दर जाहीर झाल्याशिवाय, शेतकऱ्यांनी ऊस तोडणीला परवानगी देऊ नये असा ठरावही या बैठकीत करण्यात आला.

ऊसदर संघर्ष समितीचे दीपक भोसले, सचिन पाटील, अॅड. राहुल घुले, निवास नागणे, श्रीमंत केदार, संगमेश केदार, बाळासाहेब बोबडे, संदीप फडतरे, पांडुरंग बाबर यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी या कारखान्यांनी गेल्यावर्षी जाहीर केलेला पूर्ण ऊस दर दिला आहे का, याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात तातडीने सोडावे, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. आगामी गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल जाहीर करावी, दर जाहीर होईपर्यंत सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून उसाला कोयता लावू नये असे निर्णय या बैठकीत झाले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here