सांगली : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात पूर्वी मुबलक पाऊस, पोषक हवामान आणि सुपीक जमीन या भागात भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, आता शेतकऱ्यांचा ऊस शेतीकडे कल वाढला आहे. चिंचोली (ता. शिराळा) परिसरात भाताच्या क्षेत्राहून अधिक ऊसशेती सर्वत्र दिसत आहे. पिकातून मिळणारे उत्पन्न आणि बाजारपेठेची उपलब्धता यामुळे शेतकरी ऊस पिकाला प्राधान्य देत आहेत. भात काढणीच्या काळात पाऊस झाल्यास उत्पादनाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक शेतकरी केवळ कुटुंबाच्या वर्षभराच्या गरजेपुरतेच भाताचे उत्पादन घेत आहेत. तालुक्यात भाताचे सरासरी क्षेत्र सुमारे ११ हजार ५०० हेक्टर असून, उसाचे क्षेत्र ११ हजार २३० हेक्टर आहे.
भविष्यात शिराळ्याची भात शेती नावापुरतीच उरण्याची भीती व्यक्त होत आहे. भात लागवडीपासून काढणी व मळणीपर्यंत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते. मात्र, सध्या मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने मजुरीचे दर वाढले आहेत. त्यामुळे भात शेतीची पिछेहाट झाली आहे. याबाबत प्रगतिशील शेतकरी अण्णा गायकवाड म्हणाले की, सहापैकी चार एकरांत ऊस, एक एकरात सोयाबीन, ३० गुंठ्यांत भात पीक घेतले आहे. मजुरांचा तुटवडा आणि भात काढणीच्या वेळी बसणारा पावसाचा फटका भाताचे क्षेत्र कमी केले आहे. तालुका कृषी अधिकारी किरण पवार यांच्या म्हणण्यानुसार, भाताचे पेरणीखालील क्षेत्र गेल्या तीन वर्षांत कमी झाले आहे. तालुक्यात भाताचे सरासरी क्षेत्र ११ हजार ५०० हेक्टर व उसाचे ११ हजार २३० हेक्टर क्षेत्र आहे. भाताचे क्षेत्र अधिक असले तरी प्रत्यक्ष पेरणीखालील क्षेत्र कमी आहे.


















