कोल्हापूर : देशातील साखर तुटवडा आणि किरकोळ बाजारातील दरवाढ कमी व्हावी, यासाठी केंद्र सरकार यंदा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या तयारीत आहे. आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ‘चीनीमंडी’तर्फे शेतकरी, शेतकरी संघटना, साखर कारखानदार आणि प्रशासन यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘चीनीमंडी’शी बोलताना साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी नोव्हेंबरपूर्वी हंगाम सुरू केल्यास उताऱ्यात घट होऊन कारखाने आणि शेतकरी या दोघांचेही प्रति टन सुमारे ७०० ते ९०० रुपये नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उसतोड मजुरांची उपलब्धता हा देखील एक मोठा प्रश्न असल्याचे अनेकांच्या बोलण्यातून समोर आले.
हंगाम लवकर सुरु केल्यास शेतकरी आणि कारखाने यांना होणाऱ्या संभाव्य आर्थिक नुकसानीची भरपाई सरकार देणार का ? त्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार ? असा सवाल राज्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. राज्यातील गाळप हंगामाच्या प्रारंभाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी बुधवारी मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह कृषी, सहकार आणि गाळप हंगामाशी संबंधित विभागांचे मंत्री, तसेच राज्यातील विविध साखर कारखाना संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ग्राहकांना दिलासा देत असताना शेतकरी आणि साखर उद्योग यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी सरकारला घ्यावी लागणार आहे.
शेतकऱ्यांचे प्रति टन ७०० रुपये नुकसान होण्याची शक्यता : माजी खासदार राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मते, गाळप हंगाम लवकर सुरु केल्यास उताऱ्यात साधारण एक ते दीड टक्क्याची घट होण्याची शक्यता आहे आणि सध्याच्या साखरेच्या बाजारभावाचा विचार केल्यास शेतकऱ्यांचे प्रति टन सुमारे ७०० रुपयांचे नुकसान होऊ शकते. यंदा कमी उतारा पडल्यास शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका पुढील वर्षीच्या एफआरपी निश्चितीत बसणार आहे. त्यामुळे सरकार जर साखरेचे दर कमी होण्यासाठी शुल्क मुक्त आयातीचा निर्णय घेऊ शकत असेल तर मग जो शेतकरी आपले नुकसान करून सरकारसाठी लवकर ऊस गाळपास देणार असेल तर सरकारनेही शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून आर्थिक भार उचलावा, असा पर्याय शेट्टी यांनी सुचविला. लवकर गाळप सुरु केल्यास साखरेचे एकूण उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यातून काही महिन्यांनी पुन्हा साखर टंचाईचीच शक्यता आहे. गाळप हंगाम लवकर सुरु करण्याएवजी सरकारने ज्या कारखान्यांनी उतारा चोरून जी लाखो टन साखर तयार केली आहे, ती बाजारात येण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही शेट्टी म्हणाले.
मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवासस्थानाबाहेर २९ सप्टेंबरपासून बेमुदत धरणे
केंद्र सरकारने साखरेचा किमान आधारभूत दर प्रति किलो ५० रुपये (५ हजार रुपये प्रति क्विंटल ) करावा तसेच इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा, आणि त्याचा थेट फायदा देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना व्हावा, या प्रमुख मागण्यांसाठी दोन्ही राज्यांतील लाखो ऊस उत्पादक शेतकरी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवासस्थानाबाहेर २९ सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत, असेही शेट्टी यांनी ‘चीनीमंडी’शी बोलताना सांगितले. हुबळी येथील २९ सप्टेंबरच्या धरणे आंदोलनापूर्वी केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री तसेच शेतकरी संघटनांची तातडीची संयुक्त बैठक बोलवावी. या बैठकीत साखर उद्योग, शेतकरी व ग्राहक या तिन्हींच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत. ऊस दराचा सन्मानजनक तोडगा निघत नाही, तोपर्यंत दोन्ही राज्यातील एकही साखर कारखाना सुरू करू दिला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
गाळप हंगाम लवकर सुरु केल्यास शेतकरी, कारखानदार दोघांनाही फटका : बी.बी.ठोंबरे
ऑक्टोबरमध्ये गाळप सुरू केल्यास ऊस अपरिपक्व असल्याने उसातील साखरेचे प्रमाण (उतारा) १ ते १.५ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. त्याचा थेट परिणाम साखर उत्पादनावर होऊन कारखान्यांना प्रति टन ४५० ते ५०० रुपयांचे नुकसान सहन होऊ शकते. दुसरीकडे, उसाची पुरेशी वाढ न झाल्यामुळे वजनातही १० ते १२ टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति टन ३०० ते ३५० रुपयांचा आर्थिक फटका बसू शकतो. साखर उत्पादन घटेल आणि कारखाने तसेच शेतकरी दोघांचेही नुकसान होईल. सरकारने कारखान्यांना प्रति टन ४५० ते ५०० रुपये आणि शेतकऱ्यांना ३०० ते ३५० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन (विस्मा) चे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांनी केली. ते म्हणाले, आम्ही आमची भूमिका केंद्र आणि राज्य सरकार समोर मांडली आहे, सरकारने सर्व घटकांशी विचारविनिमय करून निर्णय घ्यावा.
राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करू : साखर आयुक्त डॉ. संजय कोलते
साखर आयुक्त कार्यालयाने आगामी गाळप हंगामासाठी परवाना प्रक्रिया सुरु केली आहे. गाळप परवाना मिळवण्यासाठी कारखान्यांना १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. संबंधित कारखान्यांनी मागील हंगामातील एफआरपीचे १०० टक्के बिल अदा केलेले असणे बंधनकारक आहे. मुदतीत ऑनलाइन अर्ज न करणे, परवाना न घेता ऊस गाळप सुरू करणे किंवा परवान्याच्या अटींचे उल्लंघन करणे, अशा प्रकारच्या बाबी आढळल्यास संबंधित साखर कारखान्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितले. तसेच गाळप हंगामाबाबत राज्य सरकार जो निर्णय घेईल, त्याची काटेकोर
राज्यातील ३२ साखर कारखान्यांकडे २०१ कोटी एफआरपी थकीत
आगामी हंगामाची चर्चा सुरु झाली असली तरी राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मागील हंगामातील कोट्यवधी रुपये थकीत ठेवले आहेत. गाळप हंगामात राज्यातील २१० साखर कारखाने सहभागी झाले होते. काही कारखाने बंद होऊन सात महिन्यांचा कालावधी झाला आहे. साखर कारखाने बंद झाल्यापासून शेतकरी ऊस उत्पादक पैशांच्या प्रतीक्षेत आहेत. ३१ ऑगस्ट २०२६ अखेर राज्यातील ३२ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना मागील हंगामातील उसाचे २०१ कोटी रुपये अद्याप दिलेले नाहीत. साखर आयुक्तालयाने एफआरपी थकविलेल्या १५ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई केली आहे. एफआरपी थकविलेल्या कारखान्यांना गाळप परवाना देणार नसल्याची स्पष्ट भूमिका साखर आयुक्त कार्यालयाने घेतली आहे.


















