महाराष्ट्र : मुंबईत बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक, ऊस धोरण ठरणार

पुणे : मुंबईत बुधवारी (दि.९) यंदाच्या २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामाचे धोरण ठरवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मलबार हिल येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात दुपारी साडे बारा वाजता ही बैठक होईल. दोन्ही उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंसह अन्य मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि संबंधित उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून यंदाचा गाळप हंगाम सुरू करण्याची विनंती महाराष्ट्र सरकारला यापूर्वीच केली आहे. मात्र, गाळप हंगाम लवकर सुरू केल्यास साखर उताऱ्यामध्ये घट येत असल्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीत कोणता निर्णय होणार? याची उत्सुकता साखर उद्योगाला आहे.

राज्यात २०२६-२७च्या यंदाच्या हंगामात १५.४३ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस पीक उभे असल्याचा ३१ जुलैअखेरचा प्राथमिक अंदाज आहे. राज्यातील काही विभागात पाऊस कमी असल्यामुळे ऊस उत्पादन आणि उत्पादकतेत कमी-जास्त स्थिती राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व घटकांसह मंत्री समितीच्या होणाऱ्या बैठकीत यंदाच्या हंगामाचे धोरण बुधवारी ठरेल. दरम्यान साखरेच्या टंचाईच्या स्थितीमुळे कारखाने लवकर सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यातून बाजारपेठेमध्ये नवीन साखरेची उपलब्धता वाढून दर ऐन सणासुदीत आटोक्यात येण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, कमी कालावधीत ऊस गाळप केल्यास उतारा घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा अडचणींबाबत कोणता निर्णय घेतला होणार याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here