छत्रपती संभाजीनगर : गळीत हंगाम लवकर सुरू केल्यास उसाचा उतारा घटण्याचा धोका

छत्रपती संभाजीनगर : यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने उसाची वाढ पूर्ण क्षमतेने झालेली नाही. राज्यात सुरू आणि खोडवा उसाचे प्रमाण सुमारे ८० टक्के आहे. याला वाढीसाठी पुरेसा कालावधी मिळणे आवश्यक आहे. एक महिना अगोदर हंगाम सुरू केल्यास उसाच्या वजनात १० टक्के तर रिकव्हरीत दीड टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. त्यामुळे देशाच्या एकूण साखर उत्पादनात थेट ३५ ते ४० लाख टनांची तूट निर्माण होऊन उत्पादन २४०-२५० लाख टनांपर्यंत खाली येऊ शकते, त्यामुळे गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करू नये अशी मागणी पंचगंगा शुगर अॅण्ड पॉवर प्रा.लि., महालगावचे चेअरमन प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. हंगाम दिवाळीनंतरच सुरू करणेच फायदेशीर ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, सद्यःस्थितीत कारखाने व व्यापाऱ्यांकडे मिळून सुमारे ६० लाख टन साखरेचा साठा आहे. देशाची दोन महिन्यांची साखरेची गरज ४४ लाख टन असते. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंतची गरज भागवण्यास कोणतीही अडचण नाही. टंचाईच्या भीतीने १५ ऑक्टोबरला कारखाने सुरू करणे म्हणजे ‘रोगापेक्षा उपचार भयंकर’ ठरेल. शेतकरी व उद्योगाच्या हितासाठी १५ नोव्हेंबरची वेळच योग्य राहील. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पुढील हंगामात उसाची उपलब्धता वाढवण्यासाठी कारखान्यांमार्फत किमान ४० टक्के क्षेत्रावर ठिबक सिंचन योजना राबवणे गरजेचे आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे उसाची वाढ खुंटली आहे. अशा स्थितीत एक महिना आधी हंगाम सुरू केल्यास उसाच्या वजनात घट होऊन शेतकऱ्यांचे आणि रिकव्हरी घटून साखर कारखान्यांचे मोठे नुकसान होऊ शकते याची नोंद केंद्र व राज्य सरकारने घेणे गरजेचे आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here