पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भाजपची एंट्री; पंचरंगी लढतीचे संकेत

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे राजकीय चित्र दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. आता भारतीय जनता पक्षानेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केल्याने कारखान्याच्या सत्तेसाठी दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि भाजप अशी पंचरंगी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.निंबुत येथे सोमवारी (दि. ७) भाजपच्या वतीने शेतकरी सभासद व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात शेतकरी, सभासद, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

यावेळी सहकारमहर्षी चंद्रराव तावरे, माजी आमदार अशोक टेकवडे, ‘माळेगाव’चे माजी अध्यक्ष रंजन तावरे, माजी मार्केट कमिटी अध्यक्ष दिलीप खैरे, किसान मोर्चाचे अध्यक्ष दिग्विजय काकडे, डॉ. नितीन सावंत यांच्यासह बारामती, पुरंदर, फलटण आणि खंडाळा परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे यांनी संपूर्ण पॅनेल उभे करून सर्व जागा लढविण्याची घोषणा केली. भाजपच्या या निर्णयामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना मैदानात

यापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शेतकरी मेळावा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख हनुमंत भापकर यांनीही निवडणूक लढविण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी शिवसेना निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी शेतकरी पॅनेलच्या माध्यमातून सक्षम उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि भाजप यांच्यात पंचरंगी सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्जांची छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ऐनवेळी आघाडी, समझोता किंवा काही गटांकडून वेगळी राजकीय भूमिका घेतली जाऊ शकते. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत पंचरंगी लढत कायम राहणार की माघारीच्या टप्प्यात नवे समीकरण आकाराला येणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

दुसऱ्याच दिवशी ११७ उमेदवारी अर्ज दाखल

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्याच दिवशी, मंगळवारी (दि. ८) तब्बल ११७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली असून कारखाना कार्यक्षेत्रातील राजकीय हालचालींनाही वेग आला आहे.सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे यांनी याबाबत माहिती दिली. कारखान्याचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे यांनी मुरूम-वाल्हे गट क्रमांक दोनमधून, तर माजी सभापती प्रमोद काकडे यांनी निंबुत-खंडाळा गट क्रमांक एकमधून उमेदवारी अर्ज दाखल केला.

याशिवाय संचालक सुनील भगत, अमर होळकर, अॅड. नवनाथ भोसले, राहुल वायाळ, अतुल लकडे, विराज मदने, विक्रम जगताप, विक्रम भोसले, भाजप नेते पी. के. जगताप, माजी सरपंच संतोष कोंढाळकर, सतीश सकुंडे, ऋतुराज काकडे, दिलीप फरांदे, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, मिलिंद कांबळे, प्रमोद वायाळ, लाला माळशिकारे आणि बाळासाहेब परकाळे यांनीही विविध गटांतून उमेदवारी अर्ज दाखल केले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रमुख इच्छुकांनी मैदानात उतरत अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणे हळूहळू स्पष्ट होत आहेत. विविध राजकीय गटांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असून, आगामी काळात आणखी कोणते इच्छुक रिंगणात उतरतात, याकडे सभासदांचे लक्ष आहे.अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया, छाननी आणि त्यानंतरची माघार पूर्ण झाल्यानंतरच सोमेश्वर कारखाना निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here