सोलापूर : थकीत ऊस बिलप्रश्नी सिद्धनाथ कारखान्यासमोर शेतकरी उद्या करणार आंदोलन

सोलापूर : सन २०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामाचा कालावधी पूर्ण होऊन तब्बल आठ महिने झाले तरीदेखील तिन्हे येथील सिद्धनाथ साखर कारखान्याने काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले दिलेली नाहीत. या हंगामासाठी सिद्धनाथ साखर कारखान्याने प्रति टन २,८०० रुपये दर जाहीर केला होता. मात्र प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना केवळ २,२३७ रुपये दरानेच पेमेंट केल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे. थकीत ऊस बिलप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गुरुवारपासून कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबत कारखाना प्रशासनाला निवेदन दिले.

आगामी सण-उत्सवांचे दिवस तोंडावर आल्याने शेतकरी तीव्र आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे १० सप्टेंबरपूर्वी थकीत बिलांची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. याप्रश्नी येत्या गुरुवारपासून (दि.१०) कारखान्यांसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला असून निवेदनावर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, दीपक हजारे, अमोल पवार, युवराज भडकुंबे, मोहसीन पटेल, काकासाहेब पाटील, अजिनाथ पवार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here