सातारा : गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्यांनी पहिली उचल व अंतिम दर जाहीर करणे गरजेचे आहे. साखर कारखान्यांनी गेल्या हंगामाच्या अंतिम दरावर प्रतिटन किमान ३०० वाढीव दर जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली. याबाबत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. आगामी २०२६-२७ च्या गळीत हंगामापूर्वी जिल्ह्यातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने निकाली काढाव्यात, प्रशासनाने तत्काळ साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक बोलवून तोडगा काढावा; अन्यथा व्यापक जनआंदोलन उभारू, असा इशारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला.
निवेदनात म्हटले आहे की, साखर उद्योगाला साखर, इथेनॉल, वीजनिर्मिती, मळी आणि बगॅस यांसारख्या उपपदार्थांतून कोट्यवधींचा नफा मिळत असताना, या उत्पन्नातील न्याय वाटा मूळ उत्पादक शेतकऱ्याला दिला जात नाही. यंदा खते, मजुरी, डिझेल आणि ट्रॅक्टर मशागतीच्या खर्चात वाढ झाली आहे. हवामानातील अनिश्चिततेमुळे शेती संकटात सापडली आहे. साखर कारखान्यांनी कायद्यानुसार १४ दिवसांच्या आत बिले अदा न केल्यास ती व्याजासह वसूूल करावीत, शासनाने निश्चित केलेल्या तारखेपूर्वी बेकायदेशीर हंगाम सुरू करणाऱ्या कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करावेत आणि हंगामात होणारी काटामारी रोखावी. निवेदन देताना अर्जुन साळुंखे, मनोहर येवले, रमेश पिसाळ, राजू घाडगे, मोहन घाडगे, सुधाकर शितोळे, संदीप काळंगे, अमोल पवार, महादेव डोंगरे, जनार्दन आवारे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.


















