पुणे : माळशिरस (ता. पुरंदर) येथे शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाचा कृषी विभाग आणि अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. शिबिरासाठी पंचायत समिती सदस्य पुरंदर माऊली यादव व माळशिरस गावातील शेतकरी संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीत धान्य भुईमूग प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर डॉ. विवेक भोईटें यांची रुंद वरंबा सरी पद्धतीने भुईमूग पेरलेल्या प्रक्षेत्र भेट घेण्यात आली. शिबिरात बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन डॉ. राजेंद्र पवार यांनी एल निनोविषयी माहिती देऊन त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना उपाययोजना सांगितल्या.
यावेळी कांदा लागवड ऊस लागवड व कडधान्य पीक लागवड याविषयी डॉ. विवेक भोईटे यांनी सखोल मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती सचिन जगताप यांनी दिली. डॉ. भोईटे यांनी भुईमूग पिकाच्या रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणीचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगून कीड रोग व जमिनीचे आरोग्य याविषयी प्रक्षेत्रावर सविस्तर मार्गदर्शन केले. उप कृषी अधिकारी सचिन जगताप यांनी सूत्रसंचालन केले. सहायक कृषी अधिकारी आशिष गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.


















