बेळगाव : महाराष्ट्र सरकारने येत्या १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय झाला आहे, मात्र कर्नाटकातील गळीत हंगामाची तारीख अद्याप ठरलेली नाही. सध्या पावसाअभावी उसाची वाढ खुंटली यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांत उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यातच हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू झाल्यास कमी पक्व झालेल्या उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच साखर उतारा कमी राहू शकतो. परिणामी, एफआरपीच्या गणनेवर परिणाम होण्याबरोबरच कारखान्यांच्या साखर उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये गाळप सुरू झाल्याने जानेवारी अखेरपर्यंत हंगाम संपण्याची शक्यता निर्माण झाली तर उतारा वाढण्याचा नैसर्गिक कालावधीच कमी होईल. महाराष्ट्रातील कारखाने आधी सुरू झाल्याने सीमाभागातील ऊस मिळविण्यासाठी कर्नाटकातील कारखान्यांना स्पर्धा करावी लागेल.
बेळगाव जिल्ह्यातील २८ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम साधारण १०० दिवस चालला. या कालावधीत तब्बल पावणेदोन कोटी टनांपर्यंत उसाचे गाळप झाले. यंदा जिल्ह्यातील ३० कारखाने हंगामात सहभागी होणार असून, अनेक कारखान्यांची गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच ऊस उत्पादनात घट होण्याची भीती असताना सीमाभागातील ऊस महाराष्ट्राकडे जाण्याची भीती आहे. गेल्यावर्षी बेळगाव जिल्ह्यात रोज दोन लाख टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र उपलब्ध उसाचे प्रमाण कमी पडल्याचे गाळपाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. हंगामाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील कारखाने बंद असल्याने कर्नाटकातील कारखान्यांना त्याचा फायदा झाला. उसासाठी स्पर्धा अटळ आहे. यंदा प्रत्यक्षात उसाच्या उपलब्धतेचेच मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.


















