अहिल्यानगर : केंद्र सरकारच्या मदतीने इथेनॉल आणि ‘बायो-सीएनजी’ प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कारखाना आता उपपदार्थांच्या निर्मितीला गती देईल. कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे. डॉ. सुजय विखे-पाटील आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाने अतिशय कमी कालावधीत नव्या प्रकल्पाची उभारणी केली. बाहेरील उसावर फार अवलंबून राहून चालणार नाही, त्यामुळे कार्यक्षेत्रातच एकरी उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी ठोस नियोजन करावे लागणार आहे. संचालकांनी यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट भेटी घेऊन त्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे-पाटील होते.
पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले की, मागील वर्षी उन्हाळ्यातही पाण्याचे आवर्तन सुरू ठेवण्यात यश आले होते. यंदाची परिस्थिती मात्र खूपच आव्हानात्मक आहे. या संकटाचाही धैयनि सामना करून आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्याचे नियोजन आपल्याला करावे लागणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात कुठेही पाण्याची टंचाई भासणार नाही, अध्यक्ष डॉ. विखे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने इथेनॉल संदर्भात घेतलेल्या सकारात्मक धोरणामुळेच सहकारी साखर कारखानदारी टिकू शकली. भविष्यात १२ लाख मेट्रिक टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बायो-सीएनजी प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून सिंचन प्रकल्प मार्गी लागत आहेत. आता राहाता तालुक्यासह संपूर्ण जिल्हा दुष्काळमुक्त होईल. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के-पाटील, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, ट्रक वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदू राठी, उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, सोपानराव शिरसाठ, शांतिनाथ आहेर, अण्णासाहेब कडू, कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह संचालक आणि सभासद उपस्थित होते.


















