कोल्हापूर : आमदार अशोकराव माने यांच्या तमदलगे येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार सूतगिरणीवर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याच्या आगामी सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर सभासदांची बैठक झाली. साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढविण्याच्या नावाखाली ७२ गावांतील नवीन सभासद करून कारखाना खासगी करण्याचा घाट विद्यमान चेअरमन व संचालक मंडळाने घातला आहे. त्यास विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. साखर कारखान्याच्या १० हजार मृत सभासदांच्या वारसांना सभासद न करण्याकडे दुर्लक्ष केले गेल्याचा आरोप कारखान्याच्या माजी चेअरमन रजनीताई मगदूम यांनी केला.
सोयीनुसार सभासद वाढवून कारखाना खासगी करण्याच्या प्रयत्नांना आपला ठाम विरोध असल्याचे रजनीताई मगदूम यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, मृत सभासदांची शेवटची कांडी तुटेपर्यंत बिगरसभासदांचा ऊस तोडला जाऊ नये, यासाठी सामूहिक प्रयत्न करायला हवा. सर्व सभासद व मृत सभासदांच्या वारसांनी सर्वसाधारण सभेला उपस्थित राहून प्रथम मृत सभासदांच्या वारसांना सभासद करून घेण्याचा ठराव मंजूर करावा आणि संचालक मंडळाला त्यावर कारवाई करण्यास भाग पाडावे. कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढवून ७२ गावांचा समावेश करून मूळ सभासदांचा हक्क डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यावेळी आमदार अशोकराव माने यांनी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. पुंडलिक जाधव, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रसाद खोबरे, महादेव धनवडे, सुकुमार गडगे, केशव राऊत, कृष्णा लोहार, अण्णासाहेब राजगोंडा पाटील, शिवाजी कांबळे, अविनाश पाटील, बापू परीट, महावीर पाटील, अण्णासाहेब पाटील, बाबगोंडा पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. अभिषेक पाटील, सुकुमार उगारे, रायगोंडा पाटील, प्रकाश देसाई, धोंडिराम काशीद, दिलीप शेलार, शरद कांबळे, संतोष आवटी, शक्तीकुमार पाटील, दानलिंग चौगुले, अण्णासाहेब मनवाडे आदी उपस्थित होते. अण्णासाहेब शहापुरे यांनी सूत्रसंचालन केले.
जादा उसासाठी पंचगंगा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्र विस्तार करणार : संचालक पाटील
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारून सभासद व शेतकऱ्यांचे हित जोपासले. त्यांच्या विचारांचे व कार्याचे कारखानारूपी स्मारक जिवंत ठेवण्याचे काम संचालक मंडळाने केले आहे. त्यामुळे कारखान्याच्या खासगीकरणाचा प्रश्नच नाही. वार्षिक सभा किंवा निवडणूक जवळ आली की काही मोजके लोक एकत्र येऊन कारखाना व्यवस्थापनाला विरोध करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सभासदांनी वेळोवेळी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. कारखान्यास जास्तीत जास्त ऊस उपलब्ध व्हावा, यासाठी कार्यक्षेत्रातील गावे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गावांची संख्या वाढविल्याने कारखान्याचे खासगीकरण कदापि होणार नाही, असे कारखान्याचे संचालक धनगोंडा पाटील यांनी सांगितले.
याबाबत देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात संचालक पाटील यांनी म्हटले आहे, २००१ मध्ये रजनी मगदूम यांचे पॅनेल सत्तेवर असताना कारखान्याची अवस्था बिकट झाली होती. कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर होता. त्यामुळे तो भाडेतत्त्वावर दिला. त्यानंतर कारखाना व्यवस्थित सुरू आहे. भाडेकराराची मुदत संपत आल्याने रजनी मगदूम व विरोधकांकडून विरोध सुरू झाला आहे. कारखान्याविरोधात मुंबई उच्च न्यायालय, कोल्हापूर सर्किट बेंच तसेच केंद्रीय निबंधक, दिल्ली येथे केलेल्या तक्रारी फेटाळल्या आहेत. तरीही प्रत्येक वेळी नवा मुद्दा उपस्थित करून व्यवस्थापनाला त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही.


















