ऊस गाळप हंगाम लवकर सुरू करण्यास ‘स्वाभिमानी’चा विरोध; 10 ऑक्टोबरला 25 वी ऊस परिषद : अध्यक्ष राजू शेट्टी

कोल्हापूर : यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 दिवस आधी, म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. अपरिपक्व उसाची तोडणी केल्यास साखर रिकव्हरीत मोठी घट होऊन त्याचा थेट फटका साखर उद्योग, कारखानदार आणि विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात 15 सप्टेंबर रोजी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत ऊस गाळप हंगाम, साखरेचा किमान विक्री दर आणि इथेनॉलच्या दरासह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी यंदाची 25 वी ऊस परिषद 10 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार असल्याची घोषणा केली.

साखरेचा दर 50 रुपये किलो करण्याची मागणी

ChiniMandi WhatsApp Channel

साखरेचा किमान विक्री दर आणि इथेनॉलच्या दराबाबत केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी कर्नाटकातील हुबळी येथे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो 50 रुपये, तर इथेनॉलचा विक्री दर प्रति लिटर 70 रुपये निश्चित करावा, अशी प्रमुख मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

रिकव्हरी घटल्यास साखर उत्पादनावर परिणाम

राजू शेट्टी यांच्या मते, अपरिपक्व ऊस लवकर तोडल्यास यंदाच्या हंगामातील साखर रिकव्हरीमध्ये 1.20 ते 1.50 टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी 10 ते 12 कोटी टन उसाचे गाळप होते. रिकव्हरी कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम साखर उत्पादनावर होणार असून उत्पादनात अंदाजे 12 ते 18 लाख टनांची घट होऊ शकते. याशिवाय परतीचा पाऊस न झाल्यास ऊस उत्पादनात आणखी 15 ते 20 टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण साखर उत्पादनात 25 ते 35 लाख टनांची घट होऊ शकते, असा दावा संघटनेने केला आहे.

पुढील वर्षी एफआरपीवरही परिणाम होण्याची शक्यता

यंदाच्या साखर रिकव्हरीच्या आधारे पुढील वर्षाची एफआरपी निश्चित केली जाते. त्यामुळे रिकव्हरीत घट झाल्यास पुढील वर्षी गाळप होणाऱ्या उसासाठी शेतकऱ्यांना टनामागे सरासरी 500 ते 550 रुपयांचा फटका बसू शकतो, असा इशारा स्वाभिमानीने दिला आहे. केंद्र सरकारने बी-हेवी मळी आणि सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणल्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या व्याजाचा भार शेतकरी आणि सहकारी साखर कारखान्यांवर पडत असल्याचेही संघटनेने सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

साखर उद्योगाला 4 टक्के व्याजदराने कर्जाची मागणी

साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी नाबार्ड, एसडीएफ फंड किंवा एनसीडीसीच्या माध्यमातून खासगी व सहकारी साखर कारखान्यांना वार्षिक 4 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. मागील हंगामातील साखरेचा साठा आणि शिल्लक साठा याबाबत जवळपास 48 लाख टन साखरेच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करावे, अशीही मागणी करण्यात आली.

ऊस वाहतूक आणि वजनकाट्यांबाबतही मागण्या

कारखान्यांच्या ऊस वाहतुकीचा खर्च नियंत्रित करण्यासाठी 1 ते 25 किमी, 25 ते 50 किमी आणि 50 ते 100 किमी अंतरासाठी ऊस तोडणी व वाहतुकीचे स्वतंत्र दर निश्चित करावेत, अशी मागणी करण्यात आली. साखर कारखानदारांकडून काटामारी आणि रिकव्हरी चोरी होत असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला. वजनकाटे डिजिटल करून ते ऑनलाइन प्रणालीशी जोडावेत, अशी मागणी त्यांनी केली. दररोजच्या साखर उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार, पुरवठा विभाग, वजनमापे विभाग आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती स्थापन करावी. तसेच प्रत्येक साखरेच्या पोत्यावर बारकोड बंधनकारक करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

ऊस परिषदेत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार

29 सप्टेंबरचे हुबळी येथील धरणे आंदोलन आणि त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे होणारी 25 वी ऊस परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या ऊस परिषदेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here